Sujata Patil : वादग्रस्त महिला पोलिस अधिकारी सुजाता पाटील पुन्हा सेवेत, मविआच्या काळात लाचप्रकरणी झालं होतं निलंबन
Sujata Patil : सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनचा चार्ज होता. सुजाता पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आल्या होत्या.
मुंबई : वादग्रस्त महिला पोलिस अधिकारी सुजाता पाटील पुन्हा सेवेत रुजू होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लाच घेतल्याप्रकरणी त्यांचे निलंबन झाले होते. अप्पर मुख्य सचिव गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर सेवेत पुन्हा सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनचा चार्ज होता. सुजाता पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आल्या होत्या. सुजाता पाटील यांनी हिंगोलीत बदली न झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहून आत्महत्या आणि राजीनामा हे दोनच पर्याय असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.
महाविकास आघाडी सरकार असताना वादात अडकलेल्या चार अधिकाऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारकडून क्लीन चीट दिली असल्याचं समोर आलं आहे. नुकतंच या चारही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेत असल्याबाबतचे शासन आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये अप्पर पोलीस अधिक्षक पराग मणेरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
जोगेश्वरी येथे तक्रारदाराचा एक गाळा आहे. तो गाळा त्यांनी एका महिलेस भाडेतत्त्वावर दिला होता. पाच ऑक्टोबर रोजी तो गाळा त्यांनी भाडेकरुकडून ताब्यात घेतला होता. मात्र भाडेकरु महिलेसह इतरांनी गाळ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. याबाबत त्यांनी जोगेश्वरी पोलिसांत भाडेकरुविरुद्ध तक्रार केली. पण पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी एसीपी सुजाता पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदत मागितली होती. गाळ्याचा ताबा घेतलेल्या महिलेकडून भविष्यात त्रास होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्याकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी दहा हजार रुपये त्याच दिवशी घेतले होते. उर्वरित रक्कमेसाठी सुजाता पाटील त्यांच्याकडे तगादा लावत होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. त्यानंतर सापळा रचत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली होती.
सुजाता पाटील यांनी सांगलीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या मुलीचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं होतं. अनिकेत कोथळेची मुलगी प्रांजलच्या शिक्षणासह सर्व खर्चाची जबाबदारी घेण्याबाबतचं पत्र कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना लिहिलं होतं. त्यावेळी त्यांचे कौतुक झाले होते.