(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update | राज्यात गुरुवारी 62,194 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 63,842 रुग्ण कोरोनामुक्त
आज राज्यात दरम्यान आज 853 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे.
मुंबई : राज्यात आज तब्बल 62 हजार 194 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 63 हजार 842 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 42,27,940 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 85.54% एवढा झाला आहे. तर आज राज्यात दरम्यान आज 853 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,86,61,668 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 49,42,736 (17.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,26,089 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,406 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत आज 3056 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत आज एकूण 3056 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3838 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 2 हजार 383 आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 90 टक्के आहे. मुंबईत सध्या एकूण सक्रिय रुग्ण 50 हजार 606 आहे. कोरोना दुप्पटीचा दर आता 130 दिवसांवर गेला आहे. तर कोरोना वाढीचा दर (29 एप्रिल-3 मे) 0.51 टक्क्यांवर गेला आहे.
लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिला
देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात असली तरी त्याला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्येही राज्य प्रथम क्रमांकावर आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्यामध्येही महाराष्ट्र पहिला आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, काल 5 मे रोजी महाराष्ट्रात 1586 लसीकरण केंद्रांद्वारे एकूण 2 लाख 59 हजार 685 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 53 हजार 967 नागरिकांचा समावेश आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1 कोटी 39 लाख 15 हजार 88 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
महाराष्ट्राने लसीकरणात सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ 1 टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे. महाराष्ट्र पाठोपाठ राजस्थान (1 कोटी 35 लाख 97 हजार), गुजरात (1 कोटी 32 लाख 31 हजार), पश्चिम बंगाल (1 कोटी 14 लाख 75 हजार), कर्नाटक (1 कोटी 1 लाख 11 हजार) इतके लसीकरण झाले आहे.