Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येमध्ये काहीशी वाढ, आज 263 रुग्णांची भर तर 240 रुग्ण बरे
Coronavirus : राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्के इतके आहे तर मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे.
मुंबई: गुरुवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून येतंय. राज्यात आज 263 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी राज्यात 231 रुग्णांची नोंद झाली होती तर 208 रुग्ण बरे होऊन घरी परतले होते.
राज्यात आज दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,31,029 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्के इतके झाले आहे.
राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही 1455 इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे 898 सक्रिय रुग्ण हे मुंबईत ॉ असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतोय. पुण्यामध्ये सध्या 266 इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत 8,05,09,470 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
देशातील स्थिती
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 2841 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही वाढ 0.49 टक्क्यांनी जास्त आहे. तर गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 827 नवे रुग्ण आढळले होते तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली आहे.
दरम्यान, देशातील कोरोना बाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ही 4 कोटी 31 लाख 16 हजार 254 झाली आहे. गेल्या तर आतापर्यंत देशात कोविडमुळे एकूण 5 लाख 24 हजार 190 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजारांवर आली आहे. एकूण संसर्गाच्या 0.04 टक्के सक्रिय प्रकरणे झाली आहेत. सध्या देशातील रिकव्हरी रेट 98.74 टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 3 हजार 295 रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात आतापर्यंत एकूण 4 कोटी, 25 लाख, 73 हजार, 460 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.