मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठक, लॉकडाऊनबाबत सर्वांना विश्वासात घेऊन मोठा निर्णय होण्याची शक्यता
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन होऊ शकतो. याबाबत काल मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत देखील लॉकडाऊनबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती आहे. सध्या राज्यात कोरोना वाढत चालल्याने आता 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
दरम्यान लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार काल म्हणाले होते की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला असून येणाऱ्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, असं वडेट्टीवार म्हणाले होते. तीन आठवड्यांचा हा लॉकडाउन कडक स्वरूपाचा असायला हवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी अशी मागणीही केली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले होते. त्यामुळं आता मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व पक्षांतील नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर कोणत्या निर्यणावर पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
राज्यात वीकेंड लॉकडाऊन
कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात काल रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत जीवनावश्यक गोष्टींची दुकानं सुरु राहणार असून, सुपरमार्केट मात्र बंद असणार आहेत. तर, कोणालाही कारणाशिवाय प्रवासाची मुभा नसेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
