Congress : भाजपने आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा CM शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावीः नाना पटोले
Nana Patole On Devendra Fandnavis : आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपा (BJP) यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला (Gujarat) पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Congress) नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. या पापातील त्यांचे भागीदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना माफी मागायला सांगावी असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.
संघात खोटे बोलण्याचे प्रशिक्षण...
कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळातले असल्याचा आरोप करत भाजपकडून मविआविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवरच टीकास्त्र सोडले आहे. भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात खोटे बोलण्याचेच प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामुळे भाजपा नेते सातत्याने खोटे बोलत असतात असा टोला त्यांनी लगावला.
फडणवीसांचा डाव तरुणांनी ओळखला...
कंत्राटी पद्धतीच्या नोकरी भरतीमध्येही देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण राज्यातील जनता विशेषतः तरुण मुले-मुली यांना भाजपाचा हा खोटारडेपणा समजतो. राज्यात अडीच लाख सरकारी पदे रिक्त असताना ही पदे भाजपा सरकार भरत नाही. शिक्षक भरती, पोलीस भरती, एमपीएससी परीक्षा, तलाठी भरती मधील घोटाळा, हे पाप भाजपाचेच आहे हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. काही तरुण मुले मुली दोन-तीन वर्षापासून केवळ नियुक्तीपत्र मिळाले नाहीत म्हणून नोकरीवर रुजू होऊ शकलेले नाहीत. एमपीएससी चा सावळा गोंधळ सुरुच आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार सारखी अत्यंत जबाबदार व महत्वाची पदे एमपीएससीकडून न भरता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर मागच्याच महिन्यात काढला होता. पण खोटारडे फडणवीस स्वतःचे पाप दुसऱ्यावर टाकून नामानिराळे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची बोचरी टीका पटोले यांनी केली.
भाजपने तरुणांचा रोजगार हिरावला...
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस सारखे विविध मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवले आणि महाराष्ट्रातील आपल्याच लाखो तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप केले. शेतकरी आत्महत्या वाढल्या, शेतमालाला भाव नाही याचे पाप भाजपा सरकारचेच आहे. गुन्हेगारी वाढली, महागाई वाढली, सत्ताधारी आमदार खासदारांची दादागिरी वाढली, खोके घेऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे पापही भाजपानेच केले असल्याचा हल्लाबोल पटोले यांनी केला. या सर्व पापांबद्दल भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेची शंभरवेळा नाक घासून माफी मागतली तरी त्यांचे पाप फिटणार नाही अशी बोचरी टीका पटोलेंनी केली. राज्यातील जनता भाजपाचा कुटील डाव ओळखून आहे, भाजपाचा पापाचा घडा आता भरला असून जनताच त्यांना घरी बसवेल, असेही पटोले म्हणाले.