चाळीस दिवस उलटूनही चिपळूणमधील पूरग्रस्त व्यावसायिकांना सरकारी मदतीचा एकही रुपया जमा नाही
Chiplun Flood : मुख्यमंत्री आले, डझनभर मंत्री येउन गेले तरीही मदत मिळत नाही.नक्की मदत गेली कुठे? मदतीचा पैसा जातो कुठे? असा सवाल चिपळूणमधील व्यावसायिक करत आहेत.
रत्नागिरी चिपळूण : 22 जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्टी नदीला पुर आला आणि पुराचे पाणी शहरात शिरले. बघता बघता अख्खं शहर पाण्याखाली गेलं. जवळपास 17 तास पाण्याखाली शहर राहिल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. कुणी जीव मुठीत घेउन घराच्या छतावर तर कुणी पुराच्या पाण्यातून पोहत बाहेर निघत होते. त्यात बाजारपेठेत 12 फुट वर पाणी चढल्याने बाजारपेठेतील दुकाने अक्षरशः पुराच्या पाण्याने उध्वस्त झाली.
पुराचे पाणी ओसरल्यावर अनेक मंत्री महोदयांनी पुरपरिस्थिचा आढावा घेण्यासाठी चिपळूणचे दौरे केले. यात व्यापाऱ्यांना आश्वासनेही दिली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तोंडावर गणपती सीजन असताना आम्ही नातेवाईकांकडून पैसे घेऊन आमचं दुकाने चालू केली आहेत. मुख्यमंत्री आले, डझनभर मंत्री येउन गेले तरीही मदत मिळत नाही.नक्की मदत गेली कुठे? मदतीचा पैसा जातो कुठे? असा सवालही इथले व्यावसायिक करत आहेत.
सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आज चाळीस दिवस उलटून गेलेत तरीही मदत काहीच नाही. चिपळूणकर स्वतः हळूहळू सावरू लागले आहेत. पहिल्याप्रमाणे बाजारपेठ उभ्या राहत आहेत. आज चाळीस दिवस झाले अजूनही आमची दुकाने तशीच आहेत. दुकानात माल कसा भरायचा? घर खर्च कसा चालवायचा या विवंचनेत आहोत.विमा पॉलिसी कंपनीने तर आमची फरफट केली आहे, असं व्यावसायिक सांगत आहेत.
सर्व नेत्यांनी येऊन आमचे अश्रू पुसण्याचे काम केले.आम्हाला आश्वासन दिले तुम्ही धीर धरा, तुम्हाला आम्ही योग्य तो न्याय देऊ, मदत करु, परत तुम्हाला उभंही करु असं म्हणत शासनाने मदतही जाहीर केली त्यातली दमडी देखील आमच्या खात्यात जमा झाली नाही, असं व्यावसायिकांनी सांगितलं.
आधी कोराना मुळे मार्केट बंद राहिले त्यानंतर महापूर आला. दुकान उघडल्यावर पोलिस पाठी लागायचे. त्यांना पाहून आम्ही चोर असल्यासारखे पळून जायचो. महापूराने तर आम्हाला बुडवूनच टाकलंय. इतके दिवस मदतीची वाट बघून आम्हाला काहीच मिळाले नाही.आता आम्ही विचार करून संघटनेने तहसीलदारांना निवेदन दिले आहे.येणाऱ्या आठ दिवसांच्या आत आम्हाला मदत नाही मिळाली तर आम्ही कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत, असे व्यावसायिक सांगत आहेत. चाळीस दिवस उलटूनही पूरग्रस्त व्यावसायिकांच्या खात्यात सरकारच्या मदतीचा एकही रुपया जमा नाही, अशी माहिती आहे.