Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर घटनेप्रकरणी 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल
Chhatrapati Sambhaji Nagar : आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या आठ पथकांची नियुक्ती केली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील किराडपुरा (Kiradpura) भागात मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता. रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या घोळक्याने उत्सवासाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली. पाहता पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या होत्या. दरम्यान या प्रकरणी अखेर पोलिसांनी 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल केला आहे. शहरातील जिन्सी पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयरनुसार किराडपुरा (Kiradpura) भागात रात्री झालेल्या राड्यात एकूण 15 गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे. ज्यात पोलिसांच्या वाहनांसह खाजगी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. तर शासकीय मालमत्तेचं नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे यासह इतर कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिन्सी पोलिसांनी 400 ते 500 लोकांवर हा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींच्या शोधात आठ पथक...
दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात झालेल्या दोन गटातील वादानंतर पोलिसांनी 400 ते 500 लोकांवर हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. तसेच आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या आठ पथकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे लवकरच हल्लेखोरांचा पकडण्यात पोलिसांना यश येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया...
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्व धर्मियांना शांतता राखण्याचे माझे आवाहन आहे. गेली अनेकवर्षे आपण सर्व सण एकत्रित साजरे करत असतो. त्यामुळे शांतता राखत सर्व उत्सव साजरे केले पाहिजे. तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहील यासाठी सर्वांनीच सहकार्य केले पाहिजे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया...
छत्रपती संभाजीनगर दोन गटात झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नेत्यांनी कसं वागावं हे समजावून घायला पाहिजे. कोणीही चुकीच्या प्रतिक्रिया देऊ नयेत ही जबाबदारी सगळ्या नेत्यांची आहे. तसेच या घटनेला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव नाही असेही फडणवीस म्हणाले. तर छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या परिस्थिती निंयत्रणात आहे. परंतु शांतता पाळण्याचा प्रयत्न सर्वांना करावा लागेल. शहर शांत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं फडणवीस म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Sandipan Bhumre : संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, पालकमंत्री संदीपान भुमरेंकडून घटनास्थळी पाहणी