थरार! चालत्या ट्रकने घेतला पेट, कॅबिनमध्ये आग लागताच चालकाने घेतली उडी
Chhatrapati Sambhaji Nagar News: प्रसंगावधान राखत ड्रायव्हर आणि क्लीनरने गाडीतून सुरक्षित ठिकाणी धाव घेत जीव वाचवला.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) धुळे सोलापूर महामार्गावर चालत्या ट्रकला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आज दुपारच्या सुमरास संभाजीनगरकडून बीड कडे जाणाऱ्या चालत्या ट्रकने वायरच्या स्पर्किंग मुळे पेट घेतला. दरम्यान प्रसंगावधान राखत ड्रायव्हर आणि क्लीनरने गाडीतून सुरक्षित ठिकाणी धाव घेत जीव वाचवला. तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला यावेळी पाचरण करण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या आडूळ गावाजवळ असलेल्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून आज दुपारच्या सुमारास एक ट्रक (क्रमांक टिएन 52 एए 2247) फर्शी घेवून जात होती. दरम्यान चालू ट्रकमधून अचानक धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. दरम्यान काही कळण्याच्या आत समोरील कॅबिनमध्ये आग लागली. त्यामुळे चालकाने गाडीचा वेग कमी करून खाली उडी घेतली. चालकाने उडी घेतल्याचं पाहून सोबत असलेल्या क्लीनरने देखील गाडीतून उडी घेतली. मात्र काही वेळात आगीचा भडका अधिकच वाढला. पाहता पाहता संपूर्ण ट्रकने पेट घेतला. या घटनेत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा मार्ग बदलावा लागला. तर पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना दोन ते तीन तासांचा कालावधी लागला.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरूनजाणाऱ्या ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलिस उपनिरीक्षक प्रकाश जाधव, कर्मचारी सुनिल ठोंबरे, नारायण ससे, प्रमोद गरड यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु ट्रक पेटल्यावर आग विझविण्यासाठी तत्काळ कोणतेही यंत्रणा उपलब्ध नव्हती. मात्र काही काही तासाने अग्निशमन दलाची गाडी देखील बोलवण्यात आली. परंतु तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता. तसेच यावेळी छत्रपती संभाजीनगर व बीडकडून येणारी दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी झाली होतीमात्र महामार्ग पोलीस आणि पाचोड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी समयसूचकता
धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी ट्रकला आग लागली, तेथून अवघ्या 200 मीटरर अंतरावर गॅस एजन्सीचे गोडाऊन होते. परंतु रस्त्यावर ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत तत्काळ एजन्सीचे गॅस असेलली वाहने घटनास्थळापासून दूरू नेऊन ठेवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: