Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देशमुख कुटुंबीय आज भगवान गडावर जाणार आहेत. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...

Background
Maharashtra Breaking News Live Updates: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देशमुख कुटुंबीय आज भगवान गडावर जाणार आहेत. देशमुख कुटुंबीय महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत. यावेळी देशमुख कुटुंबिय पुराव्यांची फाईल देखील सादर करणार आहेत. तर 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. एबीपी माझाच्या मुलाखतीत मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं. संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची स्पष्टोक्ती संजय शिरसाट यांनी दिली. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांनी घेतली एकमेकांची गळाभेट
भंडारा: राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवर चिखलफेक करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांनी आज एकमेकांची गळाभेट घेत आलिंगन दिलं. भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव इथं शंकरपट शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी घेतलेली ही गळाभेट काही वेगळं राजकीय संकेत तर, देत नाही ना, अशी कुजबूज सुरू झालीय.
हमीभावाने सोयाबीन खरेदीवर प्रशासनाची राहणार करडी नजर,तालुकास्तरावर पथके गठीत
लातूर: जिल्ह्यात सुरु असलेल्या हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तालुकास्तरीय पथके गठीत करण्यात आली आहेत. याबाबतचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज निर्गमित केलेत. ही पथके दररोज अचानकपणे प्रत्येक खरेदी केंद्रावर चार वेळा भेट देवून तेथील सोयाबीन खरेदी प्रक्रियेची तपासणी करणार आहेत. राज्य शासनाने सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली असून, या काळात सोयाबीन खरेदीमध्ये अनियमितता होवू नये, नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सोयाबीनच खरेदी केली जाईल, यासाठी तालुकास्तरीय पथके उपाययोजना करणार आहेत. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना या पथकांना करण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यात सध्या विविध ५२ खरेदी केंद्रांच्या माध्यमातून हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जात आहे.























