'अभिषेक'चे 'अभिषेका' झाले अन् डमी परिक्षार्थींचा भांडाफोड, तोतयागिरीचे बीड कनेक्शन
Paperleak Connection : पेपर फुटीनंतर म्हाडाच्या परीक्षेतील तोतयागिरीचे बीड कनेक्शन समोर आले आहे.
बीड : बीडच्या अभिषेक सावंत याचा म्हाडाच्या परीक्षेचा नागपूर येथे पेपर होता. या परीक्षेत अभिषेकने स्वतःच्या जागी तोतया परीक्षार्थीला बसवले होते. मात्र स्वाक्षरी करताना परीक्षार्थीने अभिषेक ऐवजी अभिषेका नावाने स्वाक्षरी केली आणि तिथेच तो पकडला गेला. गडबडलेल्या तोतयाने तिथून पोबारा केला. मात्र नागपूर पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीने मूळ परीक्षार्थी असलेल्या अभिषेक सावंतला अटक केली आहे.
म्हाडाच्या परीक्षेतील मूळ परीक्षार्थी अभिषेक सावंतला नागपूर पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी अटक केली आहे. आरोग्य विभागातील पेपर फुटीचे प्रकरण असो की टीईटी मधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भ्रष्टाचार असो यात बीडमधल्या अनेकांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. आता तर म्हाडा परीक्षेतील तोतयागिरी करणारे बीड मधले भामटे समोर येऊ लागले आहे.
1 फेब्रुवारीला बीडमध्ये म्हडाच्या ऑनलाईन परीक्षेतील डमी उमेदवारला पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपूरमध्ये म्हाडाच्या परीक्षेत तोतया परीक्षार्थीला बसून परीक्षा देण्याचा भांडाफोड होण्यापूर्वी बीडमध्ये झालेल्या म्हाडाच्या परीक्षेत परीक्षेतही गोंधळ पाहायला मिळाला होता. वडझरी इथल्या उमेदवाराच्या जागी परीक्षा देण्यासाठी आलेल्या डमी उमेदवाराला शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
अर्जुन बिलाल बिघोट असे पकडण्यात आलेल्या डमी उमेदवाराचे नाव आहे. तो शहरातील दिशा कम्प्युटर या म्हाडा परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर आला होता. डमी उमेदवार असल्याचा संशय आल्याने परीक्षा केंद्र चालकांनी पोलिसांना तात्काळ याची माहिती दिली. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे ओळखपत्र आढळून आले नाही. शिवाय त्याच्याकडे डिव्हाईस आणि इतर साहित्य सापडले होते. त्याची चौकशी केली असता तो राहुल सानप या विद्यार्थ्याच्या जागी परीक्षा देण्यासाठी आल्याचे उघड झाले होते.
बीडमध्ये हा प्रकार घडल्यानंतर दोन आठवड्यांनी बीडच्या परीक्षार्थीने स्वतःच्या जागी तोतया परीक्षार्थी बसून म्हाडाची परीक्षा देण्याचा प्रयत्न नागपूरमध्ये उघडकीस आला आहे.
असा सापडला तोतया परीक्षार्थी..
नागपूर येथे म्हाडाच्या अभियांत्रिकी पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी 9 फेब्रुवारी रोजी परीक्षा झाली. यावेळी नागपूरच्या एमआयडीसी आयकॉन डिजिटल झोन क्र. 2 मध्ये परिक्षार्थ्यांना आत सोडताना कागदपत्रे तपासणी सुरू होती. डिजिटल स्वाक्षरी पडताळताना अभिषेक याच्या स्वाक्षरीत तोतया परिक्षार्थ्याने अभिषेका केले. त्यामुळे स्वाक्षरी जुळेना. बनावट परिक्षार्थ्याने आपण पकडले जाऊ, या भीतीने तिथून पोबारा केला. त्याचे नाव समोर आले नाही. मात्र अज्ञात तोतया परीक्षार्थीसह मूळ परिक्षार्थ्यावर नागपूर एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :