(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Winter Session : मोदींची नक्कल, विरोधकांचा गोंधळ आणि परीक्षा घोटाळ्यावर चर्चा...! असा गेला अधिवेशनाचा पहिला दिवस
आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. अपेक्षेप्रमाणे राज्यातील परीक्षा घोटाळा , शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे यासह विविध विषयांवर आज वादळी चर्चा झाली.
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक नसल्याने हे अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात येत आहे. दरम्यान, आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. अपेक्षेप्रमाणे राज्यातील परीक्षा घोटाळा , शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे यासह विविध विषयांवर आज वादळी चर्चा झाली. मात्र, आजचा दिवस गाजला तो आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या पंतप्रधानांच्या मिमिक्रीमुळे. यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत जाधवांच्या निलंबनाची मागणी केली.
भास्कर जाधवांनी केली पंतप्रधानांची नक्कल
ऊर्जा विभागांशी संबंधित विविध प्रश्नांवर सभागृह सदस्यांकडून प्रश्न विचारण्यात येत होते. यावेळी विरोधकांकडून 'सरकारने 100 युनिटपर्यंतचे बील आश्वासन देण्यात आले होते. ते पूर्ण का झाले नाही, असा प्रश्न ऊर्जा मंत्र्यांना विचारण्यात आला. यासंदर्भात उत्तर देताना, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोदींनीही 15 लाख देण्याचे आश्वासन दिले होते. ते अजून पूर्ण झालेले नाही, असे उत्तर दिले. यावरून विरोधकांनी आक्रमक होत उर्जा मंत्र्यांनी आपले शब्द मागे घेण्याची मागणी केली. तसेच मोदींनी असं कधीही म्हटलं नसून उर्जामंत्री खोटं बोलून सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. याचदरम्यान, भास्कर जाधव यांनी मोदींची नक्कल करत, निवडणुकीपूर्वी काळेधन भारतात आणून शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू असे आश्वासन दिले होते, असे वक्तव्य केले.
आणि देवेंद्र फडणवीस संतापले
दरम्यान, भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुंगटीवार यांनी आक्रमक पावित्रा घेत भास्कर जाधवांनी माफी मागावी किंवा त्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली. तसेच देशाच्या पंतप्रधानांची अशाप्रकारे नक्कल करणे ही योग्य पद्धत नसून अध्यक्षांनी भास्कर जाधवांना समज द्यावी, असेही ते म्हणाले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई
भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील खडाजंगी व्यतिरिक्त सभागृहात आज शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मुद्दाही गाजला. शेतकरी पीकविम्याच्या निधीवरून देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्यात आक्रमक चर्चा बघायला मिळाली. तसेच जळगाव जिल्ह्यातील यावल आणि चोपडा या दोन तालुक्यात वंचित असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असून यासह येत्या पंधरा दिवसांमध्ये 262 शेतकऱ्यांना 1 कोटी 33 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. या शेतकऱ्यांचे गारपीट आणि वेगाचा वारा यामुळे नुकसान झाले. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा घेतलेला आहे आणि ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, यासंदर्भात केंद्र सरकारलाही कळवले जाईल, असेही ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरूनही गदारोळ
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरूनही सभागृहात वादळी चर्चा बघायला मिळाली. नियम समितीच्या अहवालातील शिफासरीसंदर्भातील प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. यावर विरोधकांकडून हकरतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अध्यक्ष निवडीचे नियम बदलवायचे असेल तर नियमाने करा, विचार करण्यासाठी 10 दिवसांची वेळ द्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच अध्यक्षांच्या निवडणुकीच्या नियमांमध्ये बदल का करत आहे. सरकारला आपल्या सदस्यांवर विश्वास नाही का, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. महाराष्ट्राच्या इतिहासात असे सरकार बघितले नसल्याचेही ते म्हणाले.
परीक्षा घोटाळ्यावरून देवेंद्र फडणविसांचा स्थगन प्रस्ताव
राज्यात सुरू असलेल्या विविध परीक्षा घोटाळ्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. न्यासा कंपनी काळ्या यादीत होती, मग कंपनीला काम द्यायची काय आवश्यकता होती, असा प्रश्न उपस्थित करत सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच विविध परीक्षांसाठी दलालांच रेटकार्ड तयार असून परीक्षा घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला. तसेच परीक्षा घोटाळ्यावरून चर्चेसाठी वेळ द्यावा, अशी मागणीही फडणवीसांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
Omicron in Maharashtra : अधिवेशनावर कोरोनाचं संकट, RTPCR टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह