Congress : राज्यातील 1400 लोकांना व्हायचंय काँग्रेसमधून आमदार, विधानसभेसाठी पक्षाला 'अच्छे दिन'
Maharashtra Congress : विदर्भ आणि मराठवाड्यामधून काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक अर्ज आले असून त्या ठिकाणी विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा अच्छे दिन आल्याचं दिसून येतंय. कारण लोकसभेतील घवघवीत यशानंतर आता विधानसभेसाठीही काँग्रेसमधून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय. विधानसभेतील 288 जागांसाठी काँग्रेसकडे तब्बल 1400 हून अधिक इच्छुकांचा अर्ज आला आहे. त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील इच्छुकांची संख्या मोठी आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 17 जागा लढवल्या आणि त्यातील 13 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय. काँग्रेसने अंतर्गत सर्व्हे केला असून त्यामध्ये पक्षाला विधानसभेत 80 ते 85 जागा मिळतील आणि काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असं सांगण्यात आलं. त्यामुळे काँग्रेसने सर्व जागांवरील इच्छुकांचे अर्ज मागितले होते. त्यासाठी आता 1400 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही काळापासून भाजपची मजबूत पकड होती. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने या भागात जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून आलं.
दहा वर्षांनंतर काँग्रेसचे कमबॅक
2014 नंतर भाजप महाराष्ट्र विधानसभेत हळूहळू मजबूत पक्ष बनला. तर त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागा कमी होत गेल्या. 2014 मध्ये काँग्रेसने 42 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने 44 जागा जिंकल्या होत्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या आकडेवारीनंतर 288 मतदारसंघांपैकी 90 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. 2019 मध्ये काँग्रेस पक्षाकडे केवळ 476 अर्ज आले होते, परंतु आता ही संख्या तिप्पट झाली आहे.
काँग्रेसचे मिशन 2024
काँग्रेसने नुकतेच 288 विधानसभा मतदारसंघांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, MVA बैठकीत काँग्रेसने 135 जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मुंबईतील 36 पैकी 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट इच्छुक आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 5-7 जागांवर लक्ष केंद्रित करत आहे. मुस्लीम आणि दलित मतांमुळे काँग्रेसने मुंबईत जास्त जागांवर लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे मुंबई, मराठवाडा आणि विदर्भात जास्त जागा जिंकल्या तर काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता जास्त आहे. ज्याच्याकडे जास्त जागा असतील तो मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असेल.
ही बातमी वाचा :