अकोल्यात कीर्तन'कार महाराजांसह मित्राचं अपहरण, अपहरणकर्त्यांकडून 7 लाख 50 हजार रुपयांची मागणी
कीर्तनकार महाराजांसह आणखी एकाचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याची धमकीसह खंडणी मागितल्याचा प्रकार अकोल्यात समोर आला आहे.

अकोला : अकोल्यात एका कीर्तन'कार महाराजांचं त्याच्या मित्रासह अपहरणाची घटना बुधवारी रात्री घडली. यात अपहरणकर्त्यांनी अपहृतांना सोडण्यासाठी साडेसात लाखांची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी धडक कारवाई करीत गुरूवारी महाराजांची सुटका केली आहे. अकोला पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
अकोल्यात बुधवारी रात्री दोन मित्रांच्या अपहरणाने चांगलीच खळबळ उडाली. प्रशांत ढेंगळे आणि त्यांचा मित्र गौरव खारोडे यांचं खंडेलवाल शोरूम परिसरातून अपहरण करण्यात आलं होतं. यातील प्रशांत ढेंगळे हे किर्तनकार आहे. अपहरण केलेल्या या दोघांना सोडून देण्यासाठी अपहरणकर्त्यांनी साडेसात लाखांची मागणी केली होती. काल दुपारी आरटीओ मैदान परिसरातून प्रशांत आणि त्याच्या मित्राची सुटका करण्यात आली. यातील दीड लाखांची रक्कम अपहरणकर्त्यांना देण्यात आली होती. उर्वरीत रक्कम देण्याआधीच या प्रकरणात खदान पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील आरोपींमध्ये पृथ्वीराज गणेशसिंग चौहान उर्फ पप्पु ठाकुर, वेदांत राजेंद्र साबळे आणि ऋषिकेश गजानन पातोंड यांचा समावेश आहेय. वाशिमच्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून हे अपहरण केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. मात्र, अपहरणाच्या नेमक्या उद्देशाचा तपास अकोला पोलीस करीत आहेत.
नेमके कशी घडली अपहरणाची घटना :
कीर्तनकार महाराजांसह आणखी एकाचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याची धमकीसह खंडणी मागितल्याचा प्रकार अकोल्यात समोर आला आहे. अपहरण केलेल्या या दोघांना सोडून देण्यासाठी अपहरणकर्त्यांनी साडेसात लाखांची मागणी त्यांच्या कुटुंबियांकडे केली होती. यातील दिड लाख रूपये अपहरणकर्त्यांना देण्यात आले होते. यानंतर अपहरणकर्त्यांनी परत सहा लाखांची मागणी प्रशांत यांच्या कुटुंबियांकडे केली होती. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. अन पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्यात.
ऋषीकेश हनुमान ढेंगळे या अकोल्यातील खडकी परिसरातील शिवापुरच्या 27 वर्षीय युवकाच्या तक्रारीने अकोल्यातील खदान पोलीस चांगलेच हादरून गेले होते. कारण, ऋषीकेशनं त्याच्या 35 वर्षीय भावाचं मित्रासह अपहरण झाल्याची ही तक्रार होती. प्रशांत हनुमान ढेंगळे आणि गौरव खारोळे हे दोघे खंडेलवाल शोरूम येथे सर्व्हिसिंगसाठी टाकलेली दुचाकी आणण्यासाठी 8 मार्च रोजी गेला होता. दरम्यान, त्यांना कुटुंबियांनी फोन केला असता, त्यांनी दुचाकीचे थोडे काम बाकी आहे. काम झाल्यावर गाडी घेऊन येतो असं सांगितलं होतं. परंतु, बराच वेळ झाल्यावरही प्रशांत अन त्याचा मित्र आलेच नाहीत. यादरम्यान या दोघांना अनेकवेळा फोनवरही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते काहीच प्रतिसाद देत नव्हते. त्यानंतर सोबत असलेला मित्र गौरव खारोडे याच्याशी फोनवर संपर्क झाला. तेंव्हा त्याने सांगितलेल्या आपबितीने प्रशांतच्या कुटूंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने पप्पू ठाकूर नामक व्यक्तीने आम्हा दोघांचे अपहरण केल्याचे सांगितल. अन ठाकूर सोडण्यासाठी पैशांची मागणी करीत असल्याचं सांगितलं. थोड्या वेळानं अपहरण करणारा पप्पू ठाकूर ऋषी केश ढेंगळे याच्यासोबत बोलला. त्याने प्रशांतला जीवे मारण्याची धमकी देत साडेसात लाखांची मागणी केली. त्यानंतर अपहरण केलेल्या गौरव खारोडेसोबच दोन व्यक्तींना रात्री घरी पाठविले. यावेळी घरात असलेली दीड लाख रुपयांची रक्कम त्यांच्याकडे दिली. मात्र, पुन्हा 9 मार्च रोजी दुपारी अपहरणकर्त्यांनी आणखी 6 लाख रुपयांची मागणी केली. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. अन पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. खदान पोलिसांनी यातील आरोपींविरोधात भादंवि कलम 364(ए), 386(34) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील तिन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अशी आहेत अपहरणकर्त्या आरोपींची नावे :
पृथ्वीराज गणेशसिंग चौहान उर्फ पप्पु ठाकुर (वय 28 वर्षे, राहणार खदान.), वेदांत राजेंद्र साबळे (वय 22 वर्षे काम-शिक्षण रा. न्यु खेतान नगर, कौलखेड.), ऋषिकेश गजानन पातोंड (वय 23 वर्षे, रा. शिवापुर.) असे या अपहरणकर्त्यांची व्यक्तींची नावे आहे. या लोकांनी तक्रारदारांच्या भावाला म्हणजेच कीर्तन'कार महाराज प्रशांत ढेंगळे यांचं अपहरण करून शहरातील आरटीओ परिसरात असलेल्या मैदानात नेऊन त्यांना मारहाण केली. त्यानंतर डोळ्याला पट्टी बांधून विद्युत कॉलनी येथील खोलीत बांधुन ठेवण्यात आलं. जवळपास प्रशांत हे 12 तास खोलीत कैद होते. दरम्यान, पोलिसांनी लागलीच अपहरण करणाऱ्या तिन्ही लोकांना ताब्यात घेतले आणि प्रशांत ढेंगळे याची सुटका केली.
वाशिम'चा सुपारी देणारा 'तो' व्यक्ती कोण? :
काही दिवसांपूर्वी अटक असलेल्या व्यक्तींची ओळख काही दिवसांपुर्वी वाशिम जिल्ह्यातील एका व्यक्तीबरोबर झाल्याचे समजते. त्यानंतर त्याने या तिघांना अकोला शहरातील रहिवासी असलेले प्रशांत ढेंगळे याची अपहरण करून पैसे वसूली करण्याची सुपारी दिली. प्रशांत यांची कीर्तन'कार महाराज म्हणून अशी ओळख आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सात लाखांच्या जवळपास पैसे वसुली करून यातील काही रक्कम तुम्ही ठेवा, अन् उर्वरित मला द्या, असे ठरवल्याचे समजते आहे. सुपारी देणारा वाशिम येथील 'तो' व्यक्ती कोण?, अपहरणाच्या सुपारीसह वसूली उद्देश नेमका काय?, वाशिम'च्या 'त्या' व्यक्तीबरोबर महाराजांचे सबंध काय?. पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का?, या सर्व बाबींचा तपास सध्या अकोला पोलिस करत आहेत.
संबंधित बातम्या :
























