Maha Vikas Aghadi Rally : महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करणार का?
Maha Vikas Aghadi Rally : छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा पार पडत असताना महाविकास आघाडीचा मुख्य चेहरा उद्धव ठाकरे होणार का? अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. यावरुन काँग्रेसमध्ये काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे.
Maha Vikas Aghadi Rally : भाजपाच्या विरोधात एकत्रीत आलेल्या महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आता राज्यभर सभा सुरु केलेल्या आहेत. यातील पहिली वज्रमूठ सभा ही काल (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) पार पडली. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दीही झालेली पाहायला मिळाली. मात्र ही सभा पार पडत असताना महाविकास आघाडीचा मुख्य चेहरा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) होणार का? अशी चर्चा कालपासून रंगायला सुरुवात झाली आहे. यावरुन काँग्रेसमध्ये काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. समोर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी खचाखच मैदान भरल्याचं दृश्य होतं. भाजपच्या विरोधात तयार झालेली ही महाविकास आघाडी. तीनही पक्ष समान पातळीवर असणार असं तीनही पक्षांच्या अजेंड्यावर ठरलेलं आहे. मात्र असं असताना या सभेमध्ये ठाकरे गटाचे वर्चस्व अधिक पाहायला मिळत होतं. त्यामुळे नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.
यावर विरोधकांची टीका काही वेळ बाजूला ठेवली तरी मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेतृत्त्व करतात का? अस काहीसं चित्र काल सभेमध्ये पाहायला मिळत होतं.
काय झालं या सभेत?
- महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचा मंच पाहिला तर त्यावर तीनही पक्षांच्या नेत्यांचे फोटो होते. मात्र त्यावरील बॅकड्रॉप हा शिवसेना स्टाईलचा भगवा अर्थात शिवसेनेच्या सभेसारखा होता.
- उद्धव ठाकरे यांना बसण्यासाठी विशेष आसन ठेवण्यात आलेलं होतं. खरंतर तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही उपस्थित असताना सर्व नेत्यांना वेगळ्या खुर्च्या आणि उद्धव ठाकरेंना विशिष्ट आसन ठेवण्यात आलं होतं.
- उद्धव ठाकरे यांना सभेला येण्यासाठी उशीर झाला म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.
- मंचावरती उद्धव ठाकरेंची एन्ट्री होताच आणि भाषणाला सुरुवात होताच फटाक्यांची आतषबाजी पाहायाला मिळाली.
- उद्धव ठाकरे यांचं शेवटचं सर्वाधिक काळ भाषण सुरु राहिलं आणि अजित पवारांनाही आपलं भाषण आवरतं घ्यावं लागलं.
- कालच्या सभेतील हे मुद्दे ठळकपणे सर्वसामान्यांनाही जाणवत होते. त्यामुळे यापुढे महाविकास आघाडीचा चेहरा आणि नेतृत्त्व हे उद्धव ठाकरे असणार की काय अशा प्रकारची चर्चा सुरु झाली.
राजकीय विश्लेषकांचं काय मत?
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल झालेली सभेची जबाबदारी ही शिवसेनेकडे होती. त्यामुळे त्यांनी तशा प्रकारची मंचाची उभारणी केली. पुढच्या सभा नागपूरमध्ये होणार आहे. तिथे काँग्रेस आपल्या पद्धतीने तयारी करेल आणि पुढील पुण्यातील सभा ही राष्ट्रवादी आपल्या पद्धतीने करतील अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खाजगीत बोलताना दिली आहे. मात्र राजकीय विश्लेषकांचं मात्र यावर वेगळी भूमिका मांडली आहे.
महाविकास आघाडीचं नेतृत्त्व म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्याच सोबत सध्या राज्यात त्यांना सहानुभूती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेतृत्त्व करु शकतात आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. त्यामुळे तसाही प्रयत्न असू शकतो अशीही प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांनी दिली आहे.
काँग्रेस नेत्यांची नाराजी
मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी खाजगीत बोलताना यावर नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीची सभा असताना शिवसेनेचाच बोलबाला पाहायला मिळत होता. नाना पटोले गैरहजर राहिले त्यातील हे एक कारण असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे काँग्रेस ही नाराजी आपल्या हायकमांडच्या पुढे मांडणार असून यावर माहाविकास आघाडीच्या बैठकीतही चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी सभांमध्ये एका पक्षाची छाप पाहायला मिळणार की यात बदल होणार, त्याचसोबत उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून शिक्कामोर्तब होणार का? हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.