सलगच्या सुट्यामुळे शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, जेजुरीसह अष्टविनायक फुल्ल!
राज्यात सलगच्या सुट्यामुळे शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, जेजुरीसह अष्टविनायकसारख्या देवस्थानी भाविकांची गर्दी उसळली आहे.
मुंबई : सलग आलेल्या सुट्यांमुळे राज्यातील देवस्थानी भाविकांची गर्दी उसळली आहे. कोरोना महामारीमुळे अनेक महिने राज्यातील देवस्थानं बंद करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाता आलं नाही. त्यातचं आता सलग सुट्या आल्याने अनेकांनी देवस्थानं आणि पर्यटनस्थळी धाव घेतली आहे. यात शिर्डी, पंढरपूर, अक्कलकोट, कोल्हापूर, जेजुरीसह अष्टविनायक ठिकाणी भाविकांनी गर्दी केली आहे.
जेजुरीच्या खंडेरायचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते आहे. जोडुन आलेला शनिवार, रविवार आणि उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन यामुळं भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते आहे. काल रविवारी 90 हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. भाविकांची गर्दी झाली असली तरी कोरोनाचे कोणतेही नियम पाळताना भाविक दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळतो आहे.
तब्बल एक वर्षानंतर विठ्ठल दर्शनासाठी लागली भलीमोठी रांग कोरोनाचे संकट कमी होत असताना पुन्हा एकदा तब्बल वर्षानंतर विठ्ठल दर्शनासाठी भलीमोठी रांग आज पाहायला मिळाली असून सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीने ओव्हरपॅक झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे केवळ ऑनलाईन पास असणाऱ्या भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत होते. मात्र, एबीपी माझामुळे मंदिर समितीने आता सर्वच भाविकांना वयाचा पुरावा पाहून मंदिरात सोडण्यास सुरुवात केल्याने आज हजारोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
काल पुत्रदा एकादशी असल्याने पर्यटकांसोबत वारकरी देखील मोठ्या प्रमाणात आल्याने दर्शनाची रांग चंद्रभागा घाटावरील पंचमुखी मारुती मंदिरापर्यंत पोहचली होती. कोरोना संकट काळानंतर तब्बल वर्षांनी दर्शनाच्या रांगेत एवढ्या मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. आज शहरातील सर्वच हॉटेल, लॉजेस फुल असून मंदिर समितीच्या भक्त निवास मधील सर्व 200 रुम फुल झाल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. काल दिवसभरात 15 हजार भाविकांनी दर्शन घेतले असून आज किमान 30 ते 40 हजार भाविकांना विठ्ठल दर्शन मिळेल असे जोशी यांनी सांगितले.
साईनगरीत भाविकांची गर्दी.. शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून काल रविवारच्या गर्दीने कोरोना नियमावलीचे तिनतेरा वाजवले आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंतच 15 हजार भाविकांनी साईदर्शन घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे. ऑफलाईन पास वितरणात वेळोवेळी बदल होत असल्याने भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. साईबाबा संस्थानने दर्शन व्यवस्थेत सुत्रता आणने गरजेचे असुन कोरोना नियमावलीच्या अनुषंगाने उपाययोजना करताना भाविकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी भाविक करत आहेत. तासनतास पाससाठी आणि पुन्हा तेवढाच वेळ दर्शन रांगेत खर्ची होत असल्याने भाविकांमध्ये रोष वाढताना दिसतोय. तर आजही अशीच मोठी गर्दी साईनगरीत दिसत आहे.