(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुली भाव देत नाहीत म्हणून चंद्रपुरातील नाराज तरूणाचं थेट आमदारांना पत्र
रस्ते, पाणी, वीज किवा इतर मुलभूत सुविधांबाबतची मागणी लोकप्रतिनिधींकडे करणे अपेक्षित आहे. मात्र चंद्रपुरात मुली भाव देत नाहीत या समस्येकडे लक्ष देण्यासाठी एका तरुणाने आमदाराला पत्र लिहिलं आहे,
चंद्रपूर : आपल्या समस्या मांडण्यासाठी नागरिक लोकप्रतिनिधींशी पत्र आणि निवेदनांच्या माध्यमातून संवाद साधतात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका तरुणाने मुली भाव देत नाही म्हणून थेट आमदारांनाच पत्र लिहिलं आहे. या अफलातून पत्राची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे आपली ही 'नाजूक' समस्या मांडण्यासाठी या महाभागाने थेट आमदार महोदयांना पत्र न देता सोशल मीडियावर ते पत्र व्हायरल केले. ज्यामुळे हे पत्र वाचून लोकांची हसून-हसून पुरेवाट लागली आहे.
भूषण राठोड असा या पत्र लिहिणाऱ्या तरुणाचं नाव आहे. राजूरा विधानसभा क्षेत्रातील या तरुणाचे हे पत्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना लिहिलेल्या या पत्रात मुलगी पटत नसल्याची तक्रार या तरुणाने केली आहे. तालुक्यात भरभरून मुली आहेत मात्र एकही मुलगी पटत नसल्याची त्याची चिंता त्याने पत्रातून मांडली आहे.
अर्जदार खेड्यात राहतो मात्र राजुरा-गडचांदूर रोज ये-जा करतो. परंतु त्याला एकही मुलगी पटत नाही असा मजकूर पत्रात त्याने लिहिला आहे. दारू विकणाऱ्याला, इतर पोरांना गर्लफ्रेंड असते हे बघून जीव जळून राख होतो, असं त्याने पत्रात म्हटलं आहे. पत्राच्या शेवटी अर्जदार भूषण राठोड याने आमदाराना विधानसभा क्षेत्रातील मुलींना अर्जदाराला भाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची नमुनेदार विनंती केली आहे.
आमदारांना लिहिलेलं व्हायरल पत्र जसंच्या तसं
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून देखील मला एकही गर्लफेन्ड नसणे चिंतेची बाब आहे. माझा आतविश्वास खचून गेला आहे. मी खेड्यागावातील असून राजुरा गडचांदूर येथे रोज फेरी मारत असते. परंतु मला एकही मुलगी पटत नाही. दारु विकणाऱ्यांना, काऱ्या डोमऱ्यांना गर्लफेंड असते हे बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे की विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा.
मात्र हे भन्नाट पत्र लिहिणारा भूषण नेमका कोण आहे आणि कुठे राहतो? याबाबत अद्याप कुठलाच थांगपत्ता लागलेला नाही. दुसरीकडे आमदार सुभाष धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसल्याचा खुलासा केला असून क्षेत्रातील कार्यकर्त्यांना या युवकावा शोधण्यास सांगितल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तो सापडलाच तर त्याची समस्या विचारपूस करून दूर करता येईल मात्र अशा पद्धतीने पत्रप्रपंच योग्य नव्हे असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र हे पत्र व्हायरल झाल्यामुळे आता आमदारांनी आपल्या मतदारसंघात तरुण-तरुणींचे परिचय मेळावे आयोजित करावे का? अशी चर्चा लोकांमध्ये होत आहे.