Ambernath: अंबरनाथमध्ये बिबट्याच्या वावर, महिनाभरात दोनदा पाळीव प्राण्यांची शिकार; ग्रामस्थांमध्ये घबराट
Ambernath: वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये घबराट पाहायला मिळते.
Ambernath: अंबरनाथ शहरालगतच्या जंगल परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा (Leopard) वावर आढळून आलाय. त्यामुळं वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये घबराट पाहायला मिळते.
अंबरनाथजवळच्या वसत, जावसई, जांभूळ या परिसरात यापूर्वी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या. त्यामुळं या परिसरातील ग्रामस्थांमध्ये आधीच दहशतीचं वातावरण होतं. मागील महिनाभरात दोन वेळा बिबट्यानं या परिसरातील दोन पाळीव प्राण्यांची शिकार केल्याची माहिती मिळत आहे. याआधी वसत गावातील गुरुनाथ माळी यांच्या गोठ्यातून या बिबट्यानं गायीचं वासरू उचलून नेत त्याची शिकार केली होती. तर पाच दिवसांपूर्वी बिबट्यानं एका बकरीची शिकार केली होती. या दोन घटनांमुळे ग्रामीण परिसरात दहशत पसरली आहे. ग्रामस्थांनी त्यांचे तबेले आणि गुरं ठेवण्याच्या जागी पहारा द्यायला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे अंबरनाथ शहराच्या तीन झाड परिसर आणि त्यालगतच्या जंगलातही बिबट्याचा वावर वनविभागाला आढळून आलाय. या परिसरात दररोज सकाळ संध्याकाळ अंबरनाथ शहरातले नागरिक वॉक करण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी मोठ्या संख्येनं जात असतात. मात्र, बिबट्याचा वावर वाढल्यानं वनविभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. मात्र, याकडे दुर्लक्ष करून नागरिक अजूनही तीन झाड परिसरात गर्दी करतायेत, असं वनविभागाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय.
वनविवभागाने अंबरनाथ शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. भविष्यात हा बिबट्या जंगल परिसराला लागून असलेल्या शहरी भागातही येऊ शकतो. त्यामुळं काळजी घेण्याचं आवाहन वनविभागानं केलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
Raigad : शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेलं 'शिवराई होन' म्हणजे नेमकं काय?