(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मी दलित असल्यामुळे मला सापत्न वागणूक', भाजप खासदाराची खंत; फडणवीस, आठवलेंनी घेतली दखल
Latur News Updates : लातूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर 'स्टॅच्यु ऑफ नॉलेज' या 70 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजप खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
Latur MP Sudhakar Shrungare News : 'मी दलित असल्यामुळे मला सापत्न वागणूक मिळत आहे', असं खळबळजनक वक्तव्य लातूरचे भाजप खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या समोर केलं.
माझ्या कामाचे श्रेय ही प्रस्थापित घेतात
त्यांनी म्हटलं की, माझ्या कामाचे श्रेय ही प्रस्थापित घेतात. अधिकारी देखील प्रोटोकालनुसार शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण ही देत नाहीत. केलेल्या कामाचे श्रेय मिळत तर नाहीच. प्रस्थापित ते श्रेय मिळू देत नाहीत. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांमध्ये सापत्न पणाची वागणूक मिळत आहे. अधिकारी ऐकत नाहीत, हे मी दलित उपेक्षित असल्यामुळे होत असल्याची खंत लातूरचे खासदर सुधाकर श्रृंगारे यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर 'स्टॅच्यु ऑफ नॉलेज' या 70 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आले. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी प्रास्ताविक केले. त्यावेळी बोलताना खासदार श्रृंगारे यांनी ही खंत व्यक्त केली. ते म्हणाले, 70 फूट उंच या प्रतिकृतीचे काम सुरू करण्यात आल्यानंतर दोनच दिवसात हे काम महानगरपालिकेच्या माध्यमातून बंद पाडल्याचे त्यांनी सांगितले. मागील चार वर्षांपासून मी खासदार असलो तरी येथील प्रशासनाच्या वतीने मला कधीही सन्मानाने बोलावले जात नाही. मला निमंत्रण दिले जात नाही, असं ते म्हणाले.
प्रशासनातील अधिकारी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या दबावाखाली
श्रृंगारे म्हणाले की, केंद्र सरकारच्या विविध योजना लातूरमध्ये राबवण्यात आल्या होत्या. त्या योजनेचे उद्घाटन किंवा लोकार्पण असेल तर त्याही कार्यक्रमांना लातूरचे जिल्हाधिकारी हे खासदार म्हणून मला निमंत्रण देत नाहीत. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या दबावाखाली ते काम करतात. यातून माझ्यासारख्या उपेक्षित आणि दलित समाजातून आलेल्या खासदाराला डावललं जातंय असा थेट आरोप खासदार सुधाकर शृंगारे यांनी केला. कोविड काळात लातूर येथे अटल योजना किंवा पाईप लाईनने गॅस पुरवठा करणारी योजना केंद्र सरकारची आहे. मात्र त्याचे भूमिपूजन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात येते. खासदार म्हणून साधे निमंत्रण ही देण्यात येत नाही. या योजनेसाठी प्रयत्न आम्ही केले. केंद्र सरकारने निधी दिला. मात्र येथील प्रशासनातील अधिकारी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या दबावाला बळी पडले आणि माझ्यावर अन्याय केला अशी खंत त्यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली आहे.
केवळ मी दलित असल्यामुळेच मला अशी वागणूक दिली जात असल्याचं खासदार सुधाकर शृंगारे यांनी म्हटल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या घटनेची नोंद घेत असल्याचे सांगितले. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयाची गंभीर दखल घेत लातूरच्या प्रशासनातील दखल घेतली जाईल. एवढे नव्हे तर हा विषय पंतप्रधान मोदी यांच्या समोर ठेवण्यातय येईल असं देखील जाहीर सभेत सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Bhim Jayanti 2022 : इंदू मिल स्मारकासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...