एक्स्प्लोर
Advertisement
लातूरवर पुन्हा पाणीबाणीचं संकट, शहराला दहा दिवसाआड पाणी पुरवठ्याचा विचार
काही वर्षांपूर्वीच दुष्काळी स्थितीचा अनुभव लातूरकरांनी घेतला आहे. तीच वेळा आता येते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
लातूर : यावर्षी पावसाने लातूर जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची चिन्हं आहेत. परतीच्या पावसावरच आता सर्व भिस्त आहे. याचमुळे लातूर महापालिका आठ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा भविष्यकाळात जास्त दिवसाच्या अंतराने देण्याचा विचारात आहे. काही वर्षांपूर्वीच दुष्काळी स्थितीचा अनुभव लातूरकरांनी घेतला आहे. तीच वेळा आता येते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 50 टक्के पाऊस झाला असला तरी मांजरा आणि निम्न तेरणा या मोठ्या प्रकल्पांना अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 17 टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याने लातूरकरांना पिण्याच्या पाण्याविषयी चिंता कायम आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही परतीच्या पावसावरच धरणातील पाणीसाठ्याचे भवितव्य अवलंबून आहे.
जिल्ह्यात मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्प हे महत्वाचे असून इतर आठ मध्यम प्रकल्प आहेत. मांजरा धरणाच्या माध्यमातून केज, धारूर, कळंब, शिराढोण, मुरूड आणि लातूर महापालिका तसेच लातूर औद्योगिक परिसरात पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची संचय पातळी 542.37 मीटर असली तरी सद्यस्थितीला केवळ 6.374 दलघमी म्हणजे केवळ 3.50 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरणाचे क्षेत्र मोठे असले तरी यावर अवलंबून असणाऱ्या गावांचीही संख्या अधिक आहे. तर तेरणा या प्रकल्पातून जिल्ह्यातील निलंगा नगरपालिकेच्या हद्दीत पाणीपुरवठा केला जातो. या धरणात 42.956 दलघमी पाणीसाठा असून सरासरीच्या 16 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या तीन महिन्याच्या पावसाळ्याच्या कालावधीत धरणातील पाणीपातळी वाढेल असा एकही पाऊस झाला नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात 50 मिमी पाऊस झाला असला तरी या पावसावर केवळ खरीपातील पिके तरली आहेत. त्यामुळे नागरिकांना भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत आहे. मांजरा आणि तेरणा हे दोन मोठे प्रकल्प सोडता तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी केवळ शिरूरअनंतपाळ तालुक्यातील घरणी या प्रकल्पामध्ये शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे या परिसरातील शेतीचा आणि ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे.
गतवर्षीही या धरणातील पाणीसाठ्याची हीच अवस्था होती. मात्र परतीच्या पावसाने आठवड्याभरातरच सर्व प्रकल्प तुडूंब भरले होते. त्याप्रमाणेच यंदाही परतीचा पाऊस बरसावा अशी अपेक्षा बाळगली जात आहे. अन्यथा पुन्हा जिल्ह्यात पाणीबाणी होण्याचा धोका आहे.
दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे गाव शिवारातच पाणी मुरले असल्याने त्याचा शेती क्षेत्राला मोठा लाभ झाला आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी या प्रकल्पावरच मदार असून उर्वरित काळात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
लातूर महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता कलप्पा बामणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं, की “मांजरा धरणात उपयुक्त पाणीसाठा हा अवघा तीन टक्के आहे. मृत पाणीसाठी हा 47 दलघमी आहे. सध्यातरी आम्ही आठ दिवसाआड पाणी पुरवठा करत आहोत. येत्या काही दिवसात पाऊस पडले अशी अपेक्षा आहे. पाऊस झाला नाहीतर पाणीपुरवठ्याच्या दिवसात फरक करण्याचं विचाराधीन आहे. मात्र सध्या आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.”
भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागलेल्या लातूरला ट्रेनने पाणीपुरवठा करावा लागला होता. यावेळी सर्व मदार आता परतीच्या पावसावर आहे. आतापर्यंतच्या पावसाचा पिकांना फारसा फायदा झालेला नसला तरी किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement