Ahmednagar News : हिंदू-मुस्लीम ऐक्याचा भोंगा वाजवणारे श्रीगोंद्याचे लतीफभाई आणि रघुनाथदादा
अहमदनगरच्या श्रीगोंदा इथे हिंदू-मुस्लीम ऐक्याचं उदाहरण पाहायला मिळतं. श्रीगोंदा इथल्या मुस्लीम समाजातील मोटार मेकॅनिक लतीफभाई पठाण हे मागील दहा वर्षांपासून रघुनाथ जाधव या हिंदूचा सांभाळ करत आहेत.
अहमदनगर : एकीकडे मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा यावरुन हिंदू-मुस्लीम समाजात तणाव असल्याचे पाहायला मिळत असताना, अहमदनगरच्या श्रीगोंदा इथे हिंदू-मुस्लीम ऐक्याचं उदाहरण पाहायला मिळतं. श्रीगोंदा इथल्या मुस्लीम समाजातील मोटार मेकॅनिक लतीफभाई पठाण हे मागील दहा वर्षांपासून रघुनाथ जाधव या हिंदूचा सांभाळ करत आहेत. रघुनाथ यांना सांभाळणार कुणी नसल्याने त्यांना कुटुंबातील एका सदस्यांप्रमाणे लतीफभाई सांभाळतात.
श्रीगोंद्यातील रघुनाथ जाधव आणि लतीफभाई पठाण...खऱ्या अर्थाने हे दोघे हिंदू-मुस्लीम ऐक्याचा भोंगा वाजवत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लतीफभाई हे मागील दहा वर्षांपासून रघुनाथ जाधव यांच्या सांभाळ करत आहेत. रघुनाथ जाधव हे आचारी म्हणून काम करत होते. मात्र, व्यसनाच्या आहारी गेल्याने लग्न झाले नाही. नंतर आई थकली, त्यामुळे रघुनाथ रस्त्यावर आले. अशा बेघर रघुनाथ जाधव यांना लतीफभाई यांनी स्वत:च्या घरात आसरा दिला. सुरुवातीला रघुनाथ यांचं व्यसन लतीफभाई यांनी सोडवले. बघता-बघता रघुनाथ हे पठाण परिवाराचे सदस्य बनले.
लतीफभाई हे रघुनाथ जाधव यांना दसरा, दिवाळी, संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सव आणि रमजान ईदला कपडे घेतात. त्यांचा सण साजरा करतात, तर रघुनाथ देखील लतीफभाईच्या सणात सहभागी होतात. राम रहिम म्हणून आम्ही एकत्र राहतो आणि जीवनाचा आनंद लुटतो. त्यांचे कुटुंबीय मला परिवाराचा सदस्य मानतात, असं रघुनाथ जाधव सांगतात. तर रघुनाथ मला लहान भावासारखा असल्याचं लतीफभाई सांगतात.
रघुनाथ जाधव यांना मागील 25 वर्षांपासून लतीफभाई यांच्या गॅरेजवर पाहात होते तर 10 वर्षांपासून ते लतीफभाई यांच्याच घरात राहतात आणि खऱ्या अर्थाने हे दोघे हिंदू मुस्लीम एक्याचं एक उत्तम उदाहरण आहे असं ग्रामस्थ सांगतात. 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे', असा लतीफभाई यांचा स्वभाव असल्याचं ग्रामस्थ बबन गव्हाणे यांनी सांगितलं.
एकीकडे हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजणारे अनेक असतात. मात्र, लतीफभाई यांच्याप्रमाणे राम रहिम एकच आहेत हे सांगणारे क्वचितच भेटतात.