कोल्हापूर यड्राव हत्याकांडातील आरोपीला बेड्या
कौटुंबिक वादातून आरोपीने सासू, पत्नी, मेहुणा, मेहुणी यांच्यावर यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने हल्ला करत हत्या केली होती.

कोल्हापूर : कोल्हापूच्या यड्रावमधील हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीला सांगलीमध्ये अटक करण्यात आली आहे. चौघांची हत्या करणारा प्रदीप जगताप याला सांगलीवाडीमधील त्याच्या बहिणीच्या घरातून अटक करण्यात आली आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे जावयाने (प्रदीप) पत्नी ,सासू, मेहुणा आणि मेहुणी या चौघांची निर्घृण हत्या केल्याची घटना काल घडली होती. प्रदीप जगतापने हे हत्याकांड केल्याचं समोर आलं होतं. घटनेनंतर प्रदीप पसार झाल्याने, पोलीस त्याचा शोध घेत होते.
सांगली शहर पोलिसांना प्रदीप जगताप हा सांगलीवाडी येथे त्याच्या बहिणीच्या घरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तातडीने सांगलीवाडी येथे जगताप याच्या बहिणीच्या घरावर छापा टाकून प्रदीपला ताब्यात घेतलं.
कौटुंबिक वादातून प्रदीपने सासू, पत्नी, मेहुणा, मेहुणी यांच्यावर यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात छाया श्रीपती धुमाळ-आयरेकर, सोनाली अभिजित रावण, रोहित श्रीपती धुमाळ, हल्लेखोराची पत्नी रुपाली धुमाळ-जगताप यांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोर प्रदीप विश्वनाथ जगताप हा हल्ल्यानंतर पसार झाला होता.
यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने घाव घालून खून केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.























