Kolhapur : दहा लाखांची लाच घेताना दोन कॉन्स्टेबल जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला मोटर सायकल चोरीचे असल्याचं सांगत गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन लाच मागितली होती.
कोल्हापूर: स्क्रॅप म्हणून आणलेली स्पोर्ट्स मोटर सायकल चोरीची असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची भीती घालून दहा लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जाळ्यात पकडले. विजय कारंडे आणि किरण गावडे अशी या दोघांची नावे असून ते स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागात काम करतात.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील एका वकिलाच्या मुलाचा शहरात जुनी वाहने व स्क्रॅप विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने मुंबईतून स्क्रॅप म्हणून काही स्पोर्ट्स मोटर सायकल आणल्या होत्या. या मोटर सायकली चोरीच्या आहेत, त्यामुळे तुझ्यावर गुन्हा दाखल केला जाईल अशी भीती या दोन पोलिसांनी त्याला घातली. गुन्हा दाखल करायचा नसेल तर 25 लाख रुपये देण्याची मागणी केली. यामुळे घाबरलेल्या त्या मुलाने आपल्या वडिलांच्या कानावर हे घातले.
वकील असलेल्या वडिलांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. आज दुपारी कारंडे व गावडे यांनी दहा लाख रुपये घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय जवळ संबंधित तक्रारदारास बोलाविले होते. तेथे दहा लाखाची लाच घेताना दोघेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली.
संबंधित बातम्या :
- भाजप आमदाराचा आपल्याच सरकारमधील मंत्र्यावर भ्रष्ट्राचाराचा आरोप
- Crime news: कायमस्वरूपी जामीनासाठी आरोपीकडून सात लाखांची मागणी; पोलिसाला ACB कडून अटक
- Pimpri- Chinchwad : पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी लाचेची मागणी, लाचखोर महिला पीएसआयला बेड्या