Sanjay Raut : 'आमचं ठरलंय' म्हणणाऱ्यांच्या चाव्या आमच्याकडे, त्यांना घरी पाठवू; संजय राऊत यांचा सतेज पाटलांना इशारा
Kolhapur : शिवसेनेशिवाय कुणाचं काही ठरत नाही, आम्ही ठरवू तेच होईल असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
कोल्हापूर: 'आमचं ठरलंय' म्हणणाऱ्यांच्या चाव्या आमच्याकडे आहेत, शिवसेनेशिवाय कुणाचं काही ठरणार नाही असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना लगावला आहे. 'आमचं ठरलंय' म्हणणाऱ्यांना आम्ही घरी पाठवू असंही ते म्हणाले.
कोल्हापूरने महाराष्ट्राला अनेक नवनवीन शब्द आणि वाक्य दिले आहेत. काटा किर्रर्रर्र..., टांगा पलटी घोडे फरार..., खटक्यावर बोट जाग्यावर पलटी...या बरोबरच आणखी एक राजकीय शब्द उदयास आला तो म्हणजे 'आमचं ठरलंय'... हेच वाक्य राज्यभर गाजलं. पण याच वाक्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत अप्रत्यक्षपणे सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर काँग्रेस आणि शिवसेनेतील धुसफूस वाढली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीत या वाक्याच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. पण 'आमचं ठरलंय' म्हणणाऱ्यांच्या चाव्या आमच्याकडे आहेत, शिवसेनेशिवाय कुणाचं काही ठरणार नाही, आम्ही ठरवू तेच होईल असं देखील राऊत म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, "पैशाची मस्ती इथं चालणार नाही. तुमच्या किल्ल्या आमच्याकडे आहेत. शिवसेनेला सोडून काही ठरवाल तर तुमच्या खुर्च्या हलवून सोडू असंही संजय राऊत म्हणाले. कोल्हापूरची प्रत्येक निवडणूक शिवसेना जिंकेल. आमचं ठरलंय म्हणणाऱ्यांना आम्ही घरी पाठवीन. आता सगळे आम्ही ठरवणार, आम्ही ठरवलं म्हणून राज्यात सरकार आलं."
संजय राऊत यांच्या टीकेवर जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, हे सरकार कोणत्याही एका पक्षाने ठरवलं नाही तर भाजपला थोपवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार बनवलं असं आव्हाड म्हणाले.
लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची,काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील 'आमचं ठरलंय' म्हणत सर्व निवडणुकींना सामोरे गेले. मात्र महाविकास आघाडीची सत्ता आली आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा सूर उमटू लागला. हाच सूर संजय राऊत त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि म्हणूनच त्यांनी सतेज पाटील यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला.