(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोनू तुला वीजबिल भरायचं नाय का? थकीत वीजबिल भरण्यासाठी महावितरणचा अनोखा फंडा
'सोनू तुला वीजबिल भरायचं नाय का?' असं म्हणत वीजबिल भरण्यासाठीचे सगळे प्रयोग करुन झाल्यानंतर आता महावितरणने गाण्याच्या माध्यमातून थकबाकीदारांना साद घालण्यात येत आहे
कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीजबिल भरण्यासाठी सगळे प्रयत्न करुन झाल्यावर महावितरणने अनोखा फंडा अवलंबला आहे. आता थकित बिलं भरण्यासाठी थेट गाण्याच्याच माध्यमातून थकबाकीदारांना आवाहन केलं जात आहे.
'सोनू तुला वीजबिल भरायचं नाय का?' असं म्हणत वीजबिल भरण्यासाठीचे सगळे प्रयोग करुन झाल्यानंतर आता महावितरणने गाण्याच्या माध्यमातून थकबाकीदारांना साद घालण्यात येत आहे. यासाठी महावितरणने एक ऑडिओ क्लिप तयार केली आहे. वीज बिल भरण्याचे आवाहन परिणामकारक ग्राहकांपर्यंत पोहोचावे म्हणून 'सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय का?' या गाजलेल्या गाण्यासारखेच गाणे महावितरणने तयार केले आहे.
लॉकडाऊन काळात वीज वापरली आहे तर त्याचे बिल भरण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे असं या गाण्यातून सांगण्यात आलं आहे.
खासदार अमोल कोल्हे यांच्या बंधुंवर गुन्हा दाखल; आढळरावांबद्दल केलेली पोस्ट भोवली
वीज ग्राहकांकडे थकीत बिल वसूल कऱण्यासाठी गेले की महावितरणचे कर्मचारी संबंधित गाणे थकबाकीदाराला वाजवून दाखवतात, त्यामध्ये कशा पद्धतीनं वीजेचा वापर केला आहे, शा-कशासाठी वीज वापरली आहे याचा उल्लेख करण्यात आला आहे.
नेमकं गाण्यात काय-काय आहे ?
सोनू आहे राजाची शान, सोनूला गावात मान, सोनूचा मोबाईल भारी, सोनूची गाडी पण भारी
सोनू आमचा ग्राहक लाडका, आम्ही त्याला वीज देतो बरं का?, सोनूची कॉलर टाईट,
वीज बिल भरायला वाटतंय वाईट, सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का?
सोनू आमचा आंघोळीला जातो, गिजरला लागते लाईट, मात्र वीज बिल भरायला वाटते वाईट
सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का?
याच्यापेक्षाही वेगवेगळे संदर्भ या गाण्यातून देण्यात आले आहेत. साधारण 1 एप्रिल पासून ज्या ग्राहकांनी बिलं भरली नाहीत त्याचे वीजेचे कनेक्शन कापण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात 174 कनेक्शन तोडली आहेत. दोनवडे गावातील 35 घरांमधील वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. करवीर तालुक्यातील सधन गाव म्हणून दोनवडेची ओळख आहे. मात्र आता या गावातील 35 घरांमध्ये दिव्याच्या उजेडात संसार सुरू आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून 70 घरातील विद्युत पुरवठा तोडला त्यापैकी 35 जणांनी वीज बिल भरले. त्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा पुन्हा जोडण्यात आला. मात्र अचानक विद्युत पुरवठा तोडण्याच्या कारवाईने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ऊर्जा मंत्र्यांचे आदेश येताच कोणताही विचार न करता कनेक्शन तोडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.