कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शाही दसरा सोहळ्यास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा, शासन आदेश जारी
कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे.
Kolhapur Dassahra : कोल्हापूरच्या (Kolhapur) दृष्टीनं एक आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. याबाबत पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. 22 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलं आहे.
कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला वेगळं महत्त्व
मैसूरच्या शाही दसरा सोहळ्याप्रमाणे कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला महत्त्व आहे. कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या दसऱ्याला मान आहे. संस्थान काळात हा शाही दसरा अतिशय उत्साही वातावरणात साजरा व्हायचा. त्याचा राजेशाही थाट कमी झाला असला तरी परंपरा जपणारा तो उत्साह आजही कायम आहे. फार पूर्वी सोने लुटण्याचा सोहळा टेंबलाईवाडी येथील मोकळ्या माळावर होत होता. पण नंतर दसरा चौकात करण्यात येऊ लागला. जुना राजवाडा ते दसरा चौक दरम्यान निघणारा छबिना, त्यातील लवाजमा आणि करवीरकरांची मोठी गर्दी हे या शाही दसऱ्याचे खास वैशिष्ट्य. हा शाही थाट गेल्या अनेक वर्षापासून कायम राहिल्यानेच भारतात कोल्हापूरचा हा सीमोल्लंघन सोहळा चर्चेचा विषय ठरतो.
दरम्यान, सध्या दसरा चौक शहराच्या मध्यवस्तीत आहे. पण राजर्षी शाहू महाराजांचा काळ आणि त्यापूर्वी हा चौक गावाबाहेर होता. बिंदू चौकापासून पुढे फारशी वस्ती नव्हती. शाहू महाराजांच्या काळात या चौकात एकदोन वसतीगृहे आणि चित्रदूर्ग मठ एवढीच काय ती वस्ती होती. बाकी सर्व मोकळा माळ होता. या माळावर सोने लुटण्यासाठी भवानी मंडप ते दसरा चौक असा छबिना लवाजमासह निघायचा. भवानी मंडप ते दसरा चौक या दोन्ही मार्गावर हा लवाजमा पाहण्यासाठी नागरिकांची तुडुंब गर्दी असायची. त्यानंतर मावळत्या दिनकराच्या साक्षीने दसरा चौकात प्रचंड गर्दीत ऐतिहासिक सोहळ्याला उत्साह यायचा.
राजेशाही परंपरा कायम
आजच्या काळात शाही दसऱ्याच्या कार्यक्रमात लवाजमा कमी झाला असला तरी राजेशाही परंपरा कायम आहेत. दसऱ्याच्या अगोदर आठवडाभर दसरा चौकात शाही दसऱ्याची तयारी सुरू असते. लाल आणि पांढऱ्या रंगातील शामियाना उभारला जातो. चौकात मध्यभागी करवीर संस्थानाचा भव्य जरी पटका फडकत असतो. दसरा चौकाची दगडी कमान आणि पूर्वेकडील बाजूस झाडांच्या पानांची कमान बांधली जाते. जागोजागी लाल पांढऱ्या रंगाचे ध्वज असतात. सोने लुटण्याच्या लाकडाचा लगडकोट बांधला जातो. त्यांच्या आत आपट्यांची पाने गच्च बांधून ठेवली जातात. दसऱ्या दिवशी चौक सीमोलंघनासाठी सज्ज असतो.
महत्वाच्या बातम्या:
Kolhapur Shahi Dasara : कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा अभूतपूर्व उत्साहात संपन्न
























