आंगणेवाडी श्री देवी भराडीमातेची यात्रा 6 मार्चला, कोरोना पार्श्वभूमीवर यात्रा मर्यादित स्वरुपात होणार
आंगणेवाडीतील प्रसिध्द भराडी देवीची यात्रा 6 मार्च 2021 साली साजरी करण्याचं निश्चित झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा अत्यंत मर्यादित स्वरुपात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मालवण: कोकणात जत्रा म्हटलं की उत्साहाचं वातावरण पहायला मिळतं. कोकणातील गावागावात वर्षाच्या ठराविक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र भराडी देवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही, कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामं झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात. देवीला कौल लावला जातो. कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित केला जातो.
नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानुसार शनिवार 6 मार्च 2021 रोजी आंगणेवाडी यात्रा होणार आहे. आज आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक झाल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली.
दरवर्षी यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या कौलानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. यात्रेची तारीख निश्चित झाली असली तरी यावर्षीच्या यात्रेवर कोरोनाचं सावट असल्यानं आंगणे कुटुंबीयांनी या वर्षीची यात्रा अत्यंत साध्या पध्दतीनं करायची ठरवली आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर होणारा हा वार्षिकोत्सव यावर्षी मर्यादित स्वरुपात फक्त आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात येईल अशी माहिती आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली.
भाविकांच्या होणाऱ्या गैरसोईबद्दल दिलगिरी व्यक्त करत भाविकांना विनंती, आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेस नमस्कार करावा आणि आपल्या मनातील इच्छा सांगावी, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल, असं आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या: