Kirit Somaiya : देशद्रोही सोमय्यांना जोडे मारा!, सामना अग्रलेखातून शिवसेनेचा टीकेचा बाण
Kirit Somaiya vs Sanjay Raut : भ्रष्टाचाराच्या बाबतीत नाकाने कांदे सोलणाऱयांचे नाक आय.एन.एस. विक्रांत प्रकरणात साफ कापले आहे.

Kirit Somaiya vs Sanjay Raut : मागील काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि ईडी असा सामना रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर हे प्रकरण आणखीनच तापलं. शिवसेनेकडून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करण्यात आले. सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेले 58 कोटी रुपये हडपल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. आता सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. ‘देशद्रोही सोमय्यांना जोडो मारा’ या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडण्यात आला आहे.
सोमय्या व त्यांच्या मुलाने सैनिकांचे बलिदान भरबाजारात लिलावात काढले -
'विक्रांत' युद्धनौका वाचविण्यासाठी जमा केलेले 58 कोटी हडपले आहेत. देशातल्या लाखो लोकांनी किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र व देशात फिरवलेल्या डब्यांत पैसे टाकले. त्या लाखो लोकांची फसवणूक झाली. हा पैसा भाजपच्या तिजोरीत गेला नसेल तर मग कोठे पोहोचला? किरीट सोमय्या व त्यांच्या मुलाने सैनिकांचे बलिदान भरबाजारात लिलावात काढले. भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून 'कमळा'च्या साक्षीने त्यांनी हिंदुत्वाशी हा व्यभिचार केला. कायद्याने कारवाई होईलच, पण अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा. जातील तिथे फाटक्या जोडय़ांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे. सैनिकांच्या बलिदानाचा, हिंदुस्थानी युद्धनौकेचा अपमान देश सहन करणार नाही!
'विक्रांत' भंगारात जायची ती गेलीच -
भ्रष्टाचाराच्या बाबतीत नाकाने कांदे सोलणाऱयांचे नाक आय.एन.एस. विक्रांत प्रकरणात साफ कापले आहे. अण्णा हजारे व देशातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणारे कोणी उरले असतील तर त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराची ही 'विक्रांत फाईल' तपासायला हवी. बांगलादेश युद्धात हिंदुस्थानला विजय मिळवून देणाऱया 'विक्रांत' युद्धनौकेचेही भाजपचे 'महात्मा' किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील यांनी कसे शोषण केले याचे सत्य उसळून बाहेर आले आहे. विक्रांत युद्धनौका हिंदुस्थानच्या नौदलातून निवृत्त व्हायची वेळ आली तेव्हा फक्त सैन्यदलच नव्हे, तर संपूर्ण देश हळहळला. याच युद्धनौकेने 1971 च्या युद्धात कराची, चितगाव बंदरांची राख केली. पाकिस्तानच्या आरमाराला समुद्राचा तळ गाठायला लावला. अशी युद्धनौका भंगारात न काढता त्याचे कायमचे युद्ध स्मारक व्हावे व पुढच्या पिढय़ांना त्यातून प्रेरणा मिळावी, अशी भूमिका निर्माण झाली, पण 'विक्रांत' वाचविण्यासाठी लागणाऱया दोनेकशे कोटींचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा राज्य सरकार आणि केंद्राने हात झटकले. केंद्रात यूपीएचे आणि महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीचे राज्य तेव्हा होते. त्यामुळे या दोन्ही सरकारांत राष्ट्रभावना नाही वगैरे आरोप करीत 'महात्मा' सोमय्या पुढे आले व लोकवर्गणीतून 'विक्रांत'साठी आवश्यक असलेला निधी जमवून राजभवनात जमा करू असे जाहीर करून त्यांनी मुंबईसह महाराष्ट्रात मोठमोठे डबे फिरवून सामान्य जनतेकडून आणि व्यापाऱयांकडून कोटय़वधी रुपये जमा केले. या सर्व पैशांचे काय झाले? कारण 'विक्रांत' भंगारात जायची ती गेलीच.
हेच काय तुमचे देशप्रेम?, देवेंद्र फडणवीसांना सवाल -
'विक्रांत'च्या नावावर जमा केलेले कोटय़वधी रुपये राजभवनाच्या खात्यात जमा झालेच नाहीत असे सध्याच्या भाजपपुरस्कृत राज्यपालांनीच कळविल्याने भाजपचे महात्मा किरीट सोमय्या व त्यांच्या दिवटय़ा पुत्राने देशाच्या नावाने केलेली लफंगेगिरी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षातील अशा मंडळींचे राष्ट्रप्रेम, हिंदुत्व किती तकलादू आहे याचा सगळय़ात मोठा पुरावा म्हणजे 'विक्रांत' युद्धनौकेच्या नावाने केलेला भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचाराची भाजपपुरस्कृत सुरू झालेली वकिली! देशासाठी लाखो सैनिक रक्त सांडत आहेत, युद्धात बलिदान देत आहेत. त्या बलिदानाचा काळाबाजार करणाऱया किरीट सोमय्यांसारख्या देशद्रोहय़ाची वकिली करणाऱया देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला आता कीव येऊ लागली आहे. हेच काय तुमचे देशप्रेम? हेच काय तुमचे 'वंदे मातरम्'? हेच काय तुमचे 'जय जवान'? भ्रष्टाचाराची बाजू घेणे वेगळे, पण महाराष्ट्रद्वेषाने व शिवसेनेविषयीच्या चिडीने आंधळे झालेले भाजपचे पुढारी 'विक्रांत'च्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सोमय्यांच्या हातांना फुलांचे गजरे बांधू लागले आहेत. सोमय्या यांनी केलेला पैशांचा अपहार ही सरळ सरळ देशाची फसवणूक आहे. श्री. फडणवीस यांनी याप्रश्नी गप्प राहायचे सोडून स्वतःची प्रतिष्ठा ते धुळीस मिळवीत आहेत. किरीट सोमय्या यांनी युद्धनौका 'विक्रांत'च्या पैशांचा अपहार केला हे पुरावे त्यांच्याच पक्ष कार्यालयातून म्हणजे महाराष्ट्राच्या राजभवनातून पुढे आले.
भाजपचे पुरते वस्त्र्हरण झाले -
मग आता राजभवनाच्या मागेही ते ईडी वगैरेचा ससेमिरा लावणार काय? सोमय्या यांनी 'विक्रांत'च्या नावे जमा केलेल्या कोटय़वधी रुपयांचे काय केले? हा पैसा त्यांनी कोणत्या माध्यमातून 'मनी लॉण्डरिंग' करून कोठे जिरवला? पी.एम.सी. बँकेच्या माध्यमातून हे कोटय़वधी रुपये त्यांनी काळय़ाचे पांढरे केले काय? हे 'राष्ट्रीय' प्रश्न खरे तर आमचे नवहिंदुत्ववादी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पडायला हवे होते, पण ते 'विक्रांत' युद्धनौकेचा घोटाळा करणाऱयांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पुरते वस्त्र्हरण झाले. सोमय्यासारख्यांचा भ्रष्टाचारविरोधी लढा हा सदैव ब्लॅकमेलिंगचाच सौदा होता. 'विक्रांत' युद्धनौका वाचविण्यासाठी जमा केलेले 58 कोटी हडपल्याचे एक प्रकरण आता समोर आले. देशातल्या लाखो लोकांनी किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र व देशात फिरवलेल्या डब्यांत पैसे टाकले. त्या लाखो लोकांची फसवणूक झाली. हा पैसा भाजपच्या तिजोरीत गेला नसेल तर मग कोठे पोहोचला?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
