(Source: ECI/ABP News/ABP Majha)
किरीट सोमय्या फक्त टूल, खरे मास्टर माईंड चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफांचा आरोप
Hasan Mushrif on Chandrakant Patil : गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड.
Hasan Mushrif on Kirit Somaiya and Chandrakant Patil : गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड आहेत. तसेच किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की, "गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड आहेत. मी अनेकदा तुमच्यासमोर आणि जनतेसमोर माझे नेते (शरद पवार), महाविकासआघाडी सरकार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत, परमबीर सिंह प्रकरणी, तसेच केंद्रीय तपासयंत्रणांच्या गैरवापराबाबत सातत्यानं पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. तसेच याबाबत मी सातत्यानं आवाज उठवला आहे. त्यामुळंच भारतीय जनता पार्टीचे नेतेमंडळी सातत्यानं मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. आणि किरीट सोमय्यांचा टूल म्हणून वापर केलाय."
"चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी चिंतेचा विषय म्हणजे, ते ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी भाजप भुईसपाट झालेला आहे. हा कुणी भुईसपाट केलाय, तर हसन मुश्रीफ यासाठी मुख्य कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती. त्यावेळी मी त्यांना पवार एके, पवार असं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आयकर विभागाची धाड टाकली. विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी हे कारस्थान त्यांनी केलं.", असा आरोप मुश्रीफांनी केला आहे.
किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार : हसन मुश्रीफ
मुश्रीफ म्हणाले की, "किरीट सोमय्या सातत्यानं सांगतात की, मी ही कागदं काढतो आणि फडणवीसांकडे घेऊन जातो. पुढे ते सांगतात तसंच मी करतो. चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थानं लढावं, असं कुणाचातरी वापर करुन बदनामी करुन, माझ्या कुटुंबियांची बदनामी करुन त्यांना काहीही मिळणार नाही. माझ्यावर करण्यात येत असलेले सगळे आरोप खोटे आहेत. बिनबुडाचे आहेत. मागेही मी या आरोपांचा निषेध केला होता आणि 100 कोटी रुपयांचा फौजदारी अब्रूनुकसानीचा दावा करायचं मी ठरवलेलं आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आजही सोमय्यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आणि खोटा आहे. त्यांच्या या खोट्या आरोपांमुळे त्यांची सीएची पदवी खरी आहे का? असा प्रश्न पडतोय. मला त्यांना सांगायचंय की, मी तुमच्याकडे एकदा सीए पाठवतो आणि जे दोन माझ्यावर आरोप केलेत. त्याबद्दल सविस्तर माहिती घेतल्यावर त्यांच्या लक्षात येईल की, हसन मुश्रीफ हा कसा माणूस आहे."
आरोप करण्यापूर्वी नीट अभ्यास करा : हसन मुश्रीफ
"मला भाजपमधील नेते सांगतात, आम्ही सोमय्यांना म्हणत होतो मुश्रीफांच्या नादाला लागू नका. गरीब आणि सामान्य जीवाभावाचे लोक माझ्यासोबत आहेत. काल आरोप केला त्याबद्दल त्यांनी माफी मागायलाच हवी. आज त्यांनी अप्पासाहेब नलावडे कारखान्याच्या घोटाळ्याबाबत बोलले. मात्र ब्रिक्स इंडिया कंपनी आणि माझा, माझ्या जावायाचा काही संबंध नाही. मी सगळे डॉक्युमेंट काढले, ब्रिक्स इंडिया कंपनी ही 44 लाख कॅपिटलची कंपनी आहे, ही शेल कंपनी नाही, त्याचं शेअर कॅपिटल 1 लाख आहे, मग 100 कोटीचा घोटाळा होईल कसा? 2012-13 मध्ये हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीला चालवायला दिला होता 10 वर्षांसाठी सहयोगी तत्वावर. ते म्हणतात 2020ला दिला. सोमय्यांनी अभ्यास करायला हवा होता, 2020 मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली. दोन वर्ष आधीच 43 कोटीला दहा वर्षापूर्वी घेतला, तोटा होत असल्यामुळे दोन वर्षापूर्वीच कंपनीने कारखाना सोडला. 2020 ला कारखाना घेतला नाही, 2012-13 मध्ये राज्य सरकारकडून सहयोगी तत्वावर घेतला, पण नुकसानीमुळे दोन वर्ष आधीच कारखाना सोडला.", असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.
गडहिंग्लजच्या कारखान्यात मुश्रीफांकडून 100 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी केला आहे. यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या म्हणाले.