Kharghar Heatstroke: खारघरमधील उष्माघात हा नैसर्गिक, एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण
Maharashtra Bhushan Award: उष्माघात नैसर्गिक होता. नियोजनाबाबत चर्चा होऊ शकते. मात्र सर्वपक्षीयांनी केवळ राजकारण करण्यातच धन्यता मानली अशी टीकाही त्यांनी केली आहे.
मुंबई : खारघरमध्ये झालेल्यामहाराष्ट्र भूषण पुरस्कार(Maharashtra Bhushan Award) सोहळ्यात उष्माघातामुळे 14 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आले आणि त्यावर सुनावणी होण्यापूर्वी राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी यावर भाष्य केलंय. याचिकेच्या माध्यमातून कोण राजकारण करतंय असा सवाल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची आधीची नियोजत वेळ संध्याकाळची होती. मात्र श्रीसेवकांची व्यवस्था पाहता आप्पासाहेबांनी कार्यक्रम रात्री ठेवू नका अशी विनंती केल्याचं मुनगंटीवार म्हणाले. तसंच उष्माघात नैसर्गिक होता. नियोजनाबाबत चर्चा होऊ शकते. मात्र सर्वपक्षीयांनी केवळ राजकारण करण्यातच धन्यता मानली अशी टीकाही त्यांनी केलीय.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेलं काम मोठं आहे. आप्पासाहेबांसाठी श्रीसेवक आले होते. आलेले श्रीसेवक हे अप्पासाहेबांच्या प्रेमापोटी आले होते कोणी गाड्या पाठवून आणलेले लोकं नव्हती. कार्यक्रम जर रात्रीचा ठेवला असता तर कार्यक्रमानंतर घरी जाताना श्रीसेवकांना अडचण होईल म्हणून कार्यक्रम दुपारी घेतला.
20-25 लाख लोकांना बसता येईल असं मंडप घालणं अशक्य
कार्यक्रमाच्या वेळेबद्दल जर कोणाला सुचवायचं होतं तर त्यांनी सुचवायला हवं होतं ना? कार्यक्रमाचे नियोजन अतिशय व्यवस्थित केले होते. जवळपास 40-60 पानाचं प्लॅनिंग बुकलेट होतं. अतिशय सूक्ष्म नियोजन केलेलं होतं. उष्णता इतकी वाढेल याची कोणाला कल्पना नव्हती. लोकांजवळ असलेले पाणी संपलं असताना देखील जागेवरून उठून गेले नाही, पाणी व्यवस्था असताना देखील पाणी प्यायला गेले नाहीत. 20-25 लाख लोकांना बसता येईल असं मंडप घालणं अशक्य आहे. अशी दुर्दैवी घटना घडेल असा कोणी विचार देखील नव्हता केली, असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
खोटा प्रचार करून मृतांच्या आकड्यांबाबत अफवा
खारघर दुर्घटनेचे ज्या पद्धतीचे व्हिडिओ समोर आहेत त्यावरुन 14 पेक्षा जास्त मृत्यू झाला असून सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करत आहे. या विषयावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मुद्दाम खोटा प्रचार करून आकड्यांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. जर कोणाला निश्चित आकडा माहित असेल तर त्यांनी पुढं यावे. आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
मत मिळावी म्हणून जर कार्यक्रम असेल तर विरोधकांचे सभा देखील सुरु आहेत ते देखील मतांसाठीच सुरू आहे का? जखमीचे पूर्ण उपचार खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशीसाठी अधिकारी नेमला आहे, सगळं नियोजन करून देखील दुर्दैवी घटना घडली, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.