Rohit Pawar On Jitendra Awhad : रोहित पवार यांचा जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर; देव आणि धर्माऐवजी लोकांच्या मुद्यांवर बोलायला हवं!
Rohit Pawar On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात रामाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट करुन उत्तर दिलं आहे.
Rohit Pawar On Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले होते. आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार गट आणि भाजप आक्रमक होत असताना आता त्यांना पक्षातूनच विरोध होऊ लागला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात रामाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट करुन उत्तर दिलं आहे. राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडल पाहिजे.देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आव्हाडांच्या त्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यात अजित पवार गट आक्रमक झाला आहे. आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर महाआरती करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, भाजप आमदार राम कदम गुरुवारी आव्हाडांविरोधात पोलीस तक्रार करणार आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात प्रभू श्रीराम हे मांसाहारी असल्याचे वक्तव्य केल्यानंतर ठाण्यातील आव्हाडांच्या घराबाहेर अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी निषेध केला. त्यांनी आव्हाडांच्या घराबाहेर महाआरती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ अटकाव करत त्यांना ताब्यात घेतले. तर, भाजपकडूनही आव्हाडांविरोधात पोलीस तक्रार करण्यात येणार आहे.
आता, आव्हाड यांना रोहित पवारांनी घरचा आहेर देताना लोकांच्या मुद्यांवर बोलायला हवं असे रोहित यांनी म्हटले. रोहित पवारांनी म्हटले की, आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज असल्याचे रोहित पवारांनी म्हटले.
आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवारांनी पुढे म्हटले की, देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ आहे. मात्र, अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरीक म्हणून माझी भावना असल्याचे रोहित पवारांनी म्हटले.