(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बनावट विवाह करून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या वधूस जळगाव पोलिसांची अटक
दुसऱ्याच दिवशी सकाळीच वधू नवरदेवाच्या मोबाईलसह घरातून गायब झाल्याने नातेवाईकांच्या पाया खालची जमीन सरकली होती.
जळगाव : मुलींची संख्या कमी असल्याने अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत, अशाच तरुणांना हेरून त्यांच्या सोबत लग्नाचे नाटक करीत त्यांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी उज्वला गाढे या वधुसह आणखी दोन महिलांना जळगाव पोलिसांनी अटक केली आहे.
मुलगी मिळत नसल्याने कैलास चावरे या तरुणाचा विवाह होत नव्हता. हा तरुण विवाहासाठी मुलीच्या शोधात असल्याची माहिती मिळाल्यावर जळगाव शहरातील शनी मंदिर परिसरात राहणाऱ्या लिलाबाई जोशी आणि संगीता पाटील यांनी कैलास चावरेशी ओळख काढून त्याला विवाहाच्यासाठी मुलगी पाहून देण्याचा आश्वासन दिले आहे. लग्नासाठी एक लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं,अगोदरच कैलास चावरे याला मुलगी मिळत नसल्याने त्याने आणि त्याच्या कुटुंबाने या महिलांची मागणी पूर्ण करीत एक लाख रुपयांचा बदल्यात त्याचा विवाह लावून दिला होता. 30 जुलै रोजी मलकापूर येथे हा विवाह पार पडला. विवाहानंतर कैलास आणि आपल्या पत्नीसह जळगावला आपल्या राहत्या घरी परतले. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळीच वधू नवरदेवाच्या मोबाईलसह घरातून गायब झाल्याने कैलासच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या पाया खालची जमीन सरकली होती. झालेल्या घटनेनंतर कैलास याने त्याचे लग्न जुळून देणाऱ्या दोन्ही महिलांशी संपर्क करून आपली आपबीती त्यांना सांगितली. त्याने लग्न करण्या साठी दिलेल्या लाख रुपयांची मागणीसाठी या महिलांकडे तगादा लावला होता.
अगोदरच जेमतेम परिस्थिती त्यात पैसे ही गेले आणि बायकोही गेल्याने कैलास मोठ्या मानसिक तणावातून जात होता. आपले पैसे परत करा अन्यथा आपली बायको नांदायला पाठवा असा आग्रह त्याने या दोन्ही महिलांकडे लावून धरला होता. मात्र त्यांनी कोणतीही दाद न दिल्याने कैलास चावरे याने जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यावेळी कैलासने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत या घटनेचा उलगडा त्याने केला होता. कैलासच्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी त्याची फसवणूक करणाऱ्या या तिघा महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता. यावेळी विवाह लावून देणाऱ्या महिला पोलिसांच्या ताब्यात सापडल्या असल्या तरी वधू मात्र फरारच होती. पोलिसांनी तिचा शोध सुरूच ठेवला असताना ती पुणे जिल्ह्यत रांजणगाव येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळल्यावर पोलिसांनी तिला तेथून ताब्यात घेत अटक केली आहे.
उज्वला गाढे असे या वधूचे नाव असून कैलास चावरे सारख्या अनेक तरुणांशी तीन विवाहाचे नाटक करीत त्यांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. उज्वला गाढे हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून तिच्या कडून आणखी काय गुन्हे उघडकीस येतात याकडे सगळ्याच लक्ष लागले आहे.