(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Heat Wave : मान्सूनपूर्व वैशाख वणवा पेटला : जळगावचा पारा 47.2 अंशावार, आणखी दोन दिवस राहणार उष्णतेची लाट
Maharashtra Heat Wave : हवामान विभागाच्या अंदाजानुसार 12 मेपर्यंत राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात 10 आणि 11 तारखेला उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Jalgaon News Update : उत्तरेकडून येणाऱ्या गरम आणि कोरड्या वाऱ्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णता वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र स्वरूपाची लाट असल्याचं पाहायला मिळत असून यंदाच्या मोसमातील 47.2 इतक्या उच्च तापमानाची नोंद आज भुसावळ तालुक्यात करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे पाहायला मिळत असून जिल्ह्यातील केळी बागांना उष्णतेचा मोठा फटका बसला आहे.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी तापमान जास्तच असते. परंतु, गेल्या काही वर्षात जळगावातील तापमान 46 अंशाच्या वर गेले नव्हते. या वर्षी मात्र 47.2 अंशसेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. ज्यांना घराबाहेर पडणे गरजचे आहे असे नागरिक डोक्याला आणि कानाला कापड बाधून बाहेर पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्यामुळे नागरिकांनी पोटभर पाणी पिण्यासह ऊन्हापासून संरक्षण करण्याच्या साधनांचा वापर करूनच घराबाहेर पडावे, असं आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आणखी दोन दिवस राहणार उष्णतेची लाट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 12 मेपर्यंत राज्यात उष्णतेची ही लाट कायम राहणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात 10 आणि 11 मे रोजी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता असून 10 ते 12 मे दरम्यान विदर्भात देखील उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्यामुळे प्रादेशिक हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. राज्यातील अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि नगरमध्ये उष्णतेचा प्रभाव राहणार आहे.
Heat wave warnings in Maharashtra ;
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 10, 2022
उत्तर मध्य महाराष्ट्रात 10 आणि 11 तारखेला उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता;
10 ते 12 मे दरम्यान विदर्भ|त.
-IMD
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून देशभर उष्णतेच्या झळा सुरू आहेत. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 42 ते 44 अंशसेल्सिअसवर पोहोचले आहे. वाढत्या उष्माघाताने परभणीतील सोनपेठ तालुक्यामधील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताने सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथील 82 वर्षीय दत्ता पोमा जाधव या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या दोन-तीन दिवासांपूर्वीच घडली आहे.