एक्स्प्लोर
मला मुख्यमंत्रिपद न देणं एक राजकीय कट होता : सुशीलकुमार शिंदे
भूतकाळातील, वर्तमानकाळातील आणि भविष्यकाळातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी मार्मिक भाष्य केलं.
सोलापूर : ''2004 साली माझ्या नेतृत्वात निवडणुका जिंकूनही मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. मला राज्यपाल करण्यात आलं. तो एक नियोजित राजकीय कट होता,'' असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.
सोलापुरात पत्रकारांशी सुशील कुमार शिंदे बोलत होते. भूतकाळातील, वर्तमानकाळातील आणि भविष्यकाळातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी मार्मिक भाष्य केलं.
''विलासरावांशी वाद झाले नाही''
''2004 साली माझ्या नेतृत्वात निवडणुका जिंकूनही मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. मला राज्यपाल करण्यात आलं. तो एक नियोजित राजकीय कट होता. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. हाय कमांडला तो कट असल्याचं जेव्हा कळलं, तेव्हा एका रात्रीत केंद्रीय उर्जामंत्री करून सक्रीय राजकारणात आणलं. दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि माझ्यात यामुळे कसलेच वाद झाले नाहीत,'' असंही सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं.
''राजकारणातून संपवण्यासाठी घोटाळ्यात गोवण्याचा प्रयत्न झाला. पण अडकलो नाही. कोणत्याही वादविवादापासून नेहमी लांब राहतो. आदर्श प्रकरणातूनही सुटलो,'' असंही सुशील कुमार शिंदे म्हणाले.
''राजकीय हवा सोलापूरची बरी वाटते''
''राज्यपाल असताना आंध्र भवनाचा चेहरा-मोहरा बदलला. जिथे जिथे काम केलं तिथे उत्तम केलं. पण ना दिल्ली ना मुंबई, राजकीय हवा सोलापूरची बरी वाटते,'' असंही ते म्हणाले.
''सोनिया गांधींनी महाराष्ट्रातील नेत्याला सर्वोच्च बहुमान दिला''
''सोनिया गांधींनी मला लोकसभेचा सभागृह नेता म्हणून महाराष्ट्रातील नेत्याला सर्वोच्च बहुमान दिला. जो आजपर्यंत राज्यातल्या कोणत्याही नेत्याला मिळालेला नव्हता,'' असंही त्यांनी सांगितलं.
''सध्याच्या काळात एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून वर्षभर सुद्धा टिकत नाही. सोनिया गांधी काँग्रेससारख्या महाकाय पक्षाच्या अध्यक्ष राहिल्या. अनेक वर्षे सत्ता मिळवून दिली. बहुमत असतानाही स्वतः पंतप्रधान न होता अल्पसंख्याक समाजाच्या मनमोहन सिंह यांना पंतप्रधान बनवलं,'' असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाचं कौतुकही केलं.
''सभ्यतेचा राजकीय काळ हल्ली हरवत चाललाय. हमरीतुमरी आणि आक्रमक राजकीय संस्कृती उदयाला येत आहे. नव्या पिढीने राजकारणात जरूर यावं, पण संयम ठेवावा. समाजाच्या सुखदुःखाची जाणीव असावी,'' असं आवाहनही सुशीलकुमार शिंदेंनी केलं.
''राजकारणात गॉडफादर लागतोच, पण...''
''शरद पवारांच्या गटातला असल्याने तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जवळ करत नव्हते. मी हरिजन सेलचा अध्यक्ष होतो. तरी खाली बसायचो. नवखा कार्यकर्ता अध्यक्षाच्या जवळ बसायचा. मी काम करत राहिलो आणि निवडून आलो. राजकारणात गॉडफादर लागतोच. पण नेत्यामध्ये कर्तृत्व असणं गरजेचं आहे. मिळालेल्या संधीचं सोन करण्याची धमक लागते. नाहीतर गुळाचा गणपती होतो,'' असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
''साखर कारखाने, सहकारी संस्था, शैक्षणिक संकुले, उद्योग समूह मुद्दाम उभारले नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामं करायला मर्यादा आल्या असत्या,'' असंही त्यांनी सांगितलं.
''इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याप्रमाणेच देश राहुल गांधींना सुद्धा स्वीकारेल''
''काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला. तो गांधी घराण्यावर अगोदरपासून विरोधकांनी केला आहे. ज्यांच्याबद्दल अपप्रचार झाला त्यांचीच नंतर वाहवा झाली. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याप्रमाणेच देश राहुल गांधींना सुद्धा स्वीकारेल,'' असा ठाम विश्वास सुशीलकुमार शिंदेंनी बोलून दाखवला.
''... तर पवार नक्की पंतप्रधान झाले असते''
''शरद पवार चलाख राजकारणी आहेत. त्यांना राजकारणातल्या वाऱ्याची दिशा अगोदरच समजते. असंख्य नेते त्यांनी घडवले. काँग्रेस सोडली नसती तर नक्कीच शरद पवार पंतप्रधान झाले असते. त्यांच्याशिवाय दुसरा कोणीच दावेदार नव्हता,'' असंही सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं.
''प्लेटो हा राजकीय विचारवंत सुजलाम सुफलाम राजकारणाचा सिद्धांत मांडतो. तर मयाकेविली हा धूर्त राजकारणाचा पुरस्कार करतो. तर शरद पवार कात्रजचा घाट दाखवतात. या राजनितीशी मी सहमत आहे,'' असंही त्यांनी सांगितलं.
''निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात''
भारताची वाटचाल स्टार्ट अपच्या दिशेने नाही, तर स्लीप अपच्या दिशेने चालली आहे, अशी टीका सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यास हरकत नाही. पण निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात. ईव्हीएममुळे मोदींसारख्या चांगल्या माणसावर शंका घेतली जात आहे. मशिनमध्ये मोदींनी जादू केल्याचा संशय घेण्यात येतो. त्यामुळे मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जावी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
''प्रणिती शिंदे मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचणार''
दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल असेल, असंही सुशील कुमार शिंदे म्हणाले. ती मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. अग्रेसिव्ह नेता अशी प्रणितीची प्रतिमा आहे, तर मी सौम्य आहे आणि ती आक्रमक, असं ते म्हणाले.
''पंतप्रधान नरेंद्र मोदींशी वैयक्तिक ओळख आहे, त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण ते चहा विकत होते, हे अचानक 2014 साली समोर आलं. व्यक्ती म्हणून ते चांगले आहेत, पण राजकारणी म्हणून नाही. त्यांची धोरणं चुकीची आहेत,'' अशी टीका सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
दरम्यान, ''लोकसभा निवडणूक लढवायची, की नाही यावर आत्ताच बोलणार नाही,'' असंही त्यांनी स्पष्ट केलं.
''पद्मावत सिनेमा उत्तम''
''वयाच्या 77 व्या वर्षी सुद्धा आपण स्मार्ट दिसतो ही ईश्वरकृपा आहे. सध्या निवांत असल्याने कुटुंबासोबत वेळ घालवतोय. काल पद्मावत सिनेमा पाहिला. आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न खाल्ले. उत्तम सिनेमा आहे,'' असंही त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement