आषाढी एकादशी पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण, मंदिर समिती बैठकीत निर्णय
गेल्यावर्षीही आषाढी एकादशीची पूजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब येऊन केली होती. यंदा आषाढी एकादशीला परंपरेनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना निमंत्रित करण्याचा निर्णय आज मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पंढरपूर : आषाढी एकादशीला पायी पालखी सोहळ्याला यंदा परवानगी मिळणार का याबाबत अजून शासन आणि वारकरी संप्रदायात बैठकी सुरु आहे. असे असले तरी यंदा आषाढी एकादशीला परंपरेनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना निमंत्रित करण्याचा निर्णय आज मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
गेल्यावर्षीही आषाढी एकादशीची पूजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब येऊन केली होती. आज मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय गेल्यावर्षीप्रमाणे मानाच्या पालखी सोहळ्यातील पादुकांची मंदिरात येऊन विठूरायाची भेट , खाजगीवाले यांची एकादशी दिवशी होणारी पाद्यपूजा आणि आषाढी सोहळ्यानंतर होणारी प्रक्षाळ पूजा यासाठी शासनाकडे परवानगी मागण्यात आली. गेल्यावर्षीही याच पद्धतीने शासनाच्या परवानगीने कोरोना नियम पाळत आषाढी सोहळा संपन्न झाला होता. गेल्या वर्षी मानाच्या पालख्या एसटी बसने आणण्यात आल्या होत्या. यंदा कोरोनाचे संकट गेल्या वर्षी पेक्षा जास्त असल्याने यंदा पायी पालखी सोहळ्याला परवानगी देणार का हा प्रश्न असला तरी वारकरी संप्रदाय मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी अडून बसला आहे .
आषाढी एकादशी 20 जुलै रोजी होणार आहे. पालखी सोहळा होणार की नाही याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. पण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचे निमंत्रण देण्याचे ठरवले आहे. यासाठी सरकारकडे परवानगी सुद्धा मागणी केली असल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.
या यात्रेला सात संतांच्या प्रमुख मानाचे पालखी सोहळे हजारो भविकांसह पायी पंढरपूरला येत असतात. याशिवाय इतर 150 पालखी सोहळे राज्य आणि शेजारच्या राज्यातून पायी चालत येत असतात. सर्वात मोठे असलेले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पालखी सोहळे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथून येतात तर निवृत्तीनाथांची पालखी त्रिंबकेश्वर, सोपानदेव यांची सासवड, नाथ महारकांची पैठण तर मुक्ताईची मुक्ताईनगरमधून येतात.