Narendra Dabholkar Case : दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास म्हणजे हिंदू दहशतवादचा खोटा नॅरेटिव्ह तयार करण्यासाठीचा कट; विक्रम भावेंच्या पुस्तकात खळबळजनक दावे
Narendra Dabholkar Case : दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना सीबीआयचे अधिकारी कुठल्यातरी हिंदू विरोधी शक्तींच्या निर्देशांवर काम करत होते अशी शंका भावेंनी व्यक्त केली आहे.

Narendra Dabholkar Case : अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणातून निर्दोष सुटका झालेले विक्रम भावे (Vikram Bhave) यांच्या ‘दाभोळकर हत्या आणि मी’ (Dabholkar Murder and Me) या पुस्तकामध्ये अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना सीबीआयचे अधिकारी कुठल्यातरी हिंदू विरोधी शक्तींच्या निर्देशांवर काम करत होते अशी शंका आम्हाला असल्याचे गंभीर आरोप विक्रम भावे यांनी केले आहे. विक्रम भावे यांची दाभोळकर हत्या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली असून त्यानंतर विक्रम भावे यांनी "दाभोळकर हत्या आणि मी" हे पुस्तक लिहिले आहे. आज नागपुरात या पुस्तकाचे विमोचन होणार आहे. या पुस्तकात भावे यांनी दाभोळकर हत्येच्या तपासाबद्दल आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांबद्दल अनेक खळबळजन दावे केले आहे.
काय आहे भावे यांच्या पुस्तकामधील दावे?
* दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास म्हणजे "हिंदू दहशतवादचा खोटा नॅरेटिव्ह तयार करण्यासाठीचा कट" असल्याचा आरोप भावेंनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.
* दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना सीबीआयचे अधिकारी कुठल्यातरी हिंदू विरोधी शक्तींच्या निर्देशांवर काम करत होते अशी शंका आम्हाला असल्याचा दावा ही विक्रम भावे यांनी या पुस्तकात केला आहे..
* सामान्यपणे सीबीआय पीएमओ अंतर्गत काम करते, मात्र तेव्हा सीबीआयला पीएमओ ऐवजी हिंदू विरोधी शक्ती नियंत्रित करत होती का? अशी ही शंका निर्माण होत असल्याचे खळबळजनक वक्तव्य ही विक्रम भावे यांनी केले आहे..
* दाभोळकर हत्या प्रकरणात वापरण्यात आलेले शस्त्र (पिस्तूल) ठाण्यातील खाडीत फेकून नष्ट करण्यात आली, अशी एक कथा सीबीआई ने रचली होती... आणि त्यासाठी ठाण्यातील खाडीतून ती पिस्तूल जप्त काढण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तब्बल पावणेआठ कोटी रुपये खर्च केले.. त्यासाठी नॉर्वे मधून विशेष डायव्हर्स बोलवले, दुबईच्या एका कंपनीला कंत्राट देण्यात आले.. मात्र तरीही तो पिस्तूल जप्त होऊ शकलं नाही.. त्या संदर्भातला एकही पुरावा सीबीआयने कोर्टासमोर ठेवला नाही.. त्यामुळे ते पैसे कोणी खाल्ले असा प्रश्न पुस्तकातून उपस्थित करण्यात आलं आहे..
* दाभोळकर यांच्या कथित हत्या प्रकरणातील शूटर्सला मी (विक्रम भावे ) पुण्यात रेकी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप सीबीआयने माझ्यावर ठेवला होता.. त्यासाठी दोन मोबाईल नंबर माझ्या वापरातील असल्याचा दावा ही सीबीआई ने केला होता.. मात्र त्या संदर्भात कुठलेही ठोस पुरावे, त्या नंबरचे सीडीआर सीबीआयचे अधिकारी न्यायालयात देऊ शकले नाही..
* या देशात हिंदुत्ववादी असणं अपराध आहे की काय असे अनुभव दाभोळकर हत्या प्रकरणाच्या तपासाच्या वेळेला आले.. हिंदुत्ववादी असल्यामुळेच मला आणि माझ्या कुटुंबाला बरेच काही भोगावे लागले.. तेव्हा हिंदू व हिंदुत्व विरोधी षडयंत्र रचला गेला आणि आताही रचला जात आहे... देशातील सर्वसामान्य हिंदूंना हे कळावं म्हणून पुस्तक लिहिल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
आज नागपुरात विक्रम भावे यांच्या "दाभोळकर हत्या आणि मी" या पुस्तकाचे विमोचन होणार आहे. त्यापूर्वी एबीपी माझाशी बातचीत करताना विक्रम भावे यांनी पुस्तकात नमूद केलेल्या मुद्द्यांवरून सीबीआयवर अनेक गंभीर आरोप केले आहे..
























