(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कुत्रे कितीही भुंकले तरी हत्ती थाटात चालतो, व्हायरल ऑडियो क्लिपप्रकरणी इंदोरीकर महाराजांचा निलेश लंकेंना पाठिंबा
इंदोरीकर महाराजांनी आमदार निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक करत आपल्या शैलीतून झालेल्या आरोपंकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे.
अहमदनगर : पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे आमदार निलेश लंके यांच्यावर रोष असल्याचे समोर आले होते. मात्र कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी आमदार निलेश लंके यांचे कौतुक करत त्यांना पाठिंबा दिला आहे.
कुत्रे कितीही भुंकले तरी हत्ती थाटात चालत असतो, असे सांगत निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी निलेश लंके यांना धीर दिला आहे. निलेश लंके यांनी उभारलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी इंदोरीकर महाराजांनी निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक करत आपल्या शैलीतून झालेल्या आरोपंकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे.
याआधी आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. 'असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. यावेळी ज्योती देवरे यांच्या कामाबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या अहवालाची प्रत निलेश लंके यांनी अण्णांना दाखवली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी देखील ज्योती देवरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर योग्य त्या कारवाईसाठी वेळ पडली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार असल्याचे अण्णांनी सांगितले आहे.
देवरे यांच्यावर कामात हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका
तहसीलदार ज्योती देवरे यांनी अनेक कामात हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका आहे. तसेच वाळू साठ्यात गैरव्यवहार करून शासनाचे मोठं नुकसान केल्याचा ठपका देखील त्यांच्यावर आहे. ज्योती देवरे यांनी शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता ठेवली नाही. कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडली नाही. कामात हयगय केली आहे. वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला आहे, असे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ क्लिपमधून आत्महत्येचा इशारा, आमदार निलेश लंके म्हणाले
ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी अमरावतीचे वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास तसेच वरिष्ठांचे दुर्लक्ष या बाबत सविस्तर कथन ऑडिओ क्लिपमध्ये केले आहे. तहसीलदार यांच्या ऑडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून ज्योती देवरे यांनी स्वतःची ऑडिओ क्लिप तयार केलीय. मी लवकरच तुझ्या सोबत येत आहे, असं सांगून महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो याचा उल्लेख ज्योती देवरे यांनी केलाय. आपल्याविरुद्ध प्रश्न उपस्थित करणे, दमदाटी करणे, मी मारहाण करते असे माझ्या गाडीत चालकाकडून लिहून घेणे, धमकी देणे असे अनेक प्रकार घडल्याचे देवरे यांनी क्लिपमध्ये नमूद केले आहे. इतकेच नाही तर कोविड लसीकरणावरून आमदार निलेश लंके यांनी आरोग्य कर्मचार्याला मारहाण केली आणि नंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. या घटनेचा उल्लेखही ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप मध्ये केलाय.
पारनेरच्या तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ क्लिपची फडणवीस यांच्याकडून दखल, मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र