मुख्यमंत्र्यांचा कोर्लई येथील घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी; किरीट सोमय्या यांचा आरोप
कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याने तहसीलदार , जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी
अलिबाग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील जमीन घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी करून गावावर अन्याय करीत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे खरेदी केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी यासंदर्भात रेवदंडा पोलिसांना पुरावे सादर केले होते. परंतु , यानंतरही या संदर्भात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. तर , या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची मागणी देखील सोमय्या यांनी केली होती.
परंतु, आजमितीस या संदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने सोमवारी किरीट सोमय्या हे कोर्लई येथे जाऊन घोटाळ्या संदर्भातील माहिती देणार होते. याचदरम्यान कोर्लई येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळासाठी गावबंदी करण्याचे आदेश देण्यात आले. कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या धर्तीवर लागू करण्याच येणारे नियम इथं लागू करत थेट गावबंदीच लागू करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रसंगी करण्यात आलेल्या गावबंदीवर सोमय्या यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जमीन घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी करून गावावर अन्याय करीत असल्याचा आरोप किरीट त्यांनी केला आहे. त्याचबरोबर, कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याने तहसीलदार, जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांची सोमवारी भेट घेऊन याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.