Pune Chandani Chowk : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं दिमाखात उद्घाटन; किती कोटी खर्च?
पुण्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या चांदणी चौकातील प्रकल्पाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा प्रकल्प पुणेकरांसाठी महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो.
पुणे : पुण्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या चांदणी चौकातील (Chandani Chawk Flyover) प्रकल्पाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. हा प्रकल्प पुणेकरांसाठी महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. या उड्डाणपुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. या कार्य़क्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचा विकास कसा झाला हे सांगितलं. त्यानतर नितिन गडकरींनीदेखील पुण्यातील वाहतूक कोंडी, प्रदूषण, भविष्यातील उड्डाणपूल याबाबत भाष्य केलं आहे.
या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, राहुल कुल, सुनिल कांबळे, संजय जगताप, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.
कसा आहे प्रकल्प, किती आला खर्च?
पुणे शहरात एनडीए चौकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वर सर्व मार्गिकांसहित एकूण 16.98 किलोमीटर लांबीचा पायाभूत सुविधा व रस्ते विकास प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची किंमत 865 कोटी असून प्रकल्पामुळे परिसरात अखंड आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक सहा पदरी करण्यात आली असून अंतर्गत आणि बाह्य सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच 8 वेगवेगळ्या मार्गिकांची उभारणी करण्यात आली आहे.
मुळशी-सातारा, मुळशी-मुंबई, मुळशी-पाषाण, सातारा/कोथरूड-मुळशी, पाषाण-मुंबई, पाषाण-सातारा, सातारा/कोथारूड-पाषाण आणि मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याकडे अशा आठ मार्गिका आहेत.
एनडीए ते पाषाण ओव्हरपास आणि पाषाण ते मुंबई तसेच सातारा/कोथरूड ते मुळशी असे दोन अंडरपासही करण्यात आले आहेत.
एनडीए चौकात येणारी सर्व बाजूंची वाहतूक सिग्नलमुक्त करण्यात आली आहे. जून्या पुलाच्या ठिकाणी नवा विस्तारीत पूल उभारण्यात आला आहे. परिसराचे सुशोभिकरणही करण्यात येत आहे.
खेड आणि मंचर येथील वळण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची लांबी 14.137 किलोमीटर असून प्रकल्पाची किंमत 495 कोटी आहे.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार
मागील काही महिन्यांपासून चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलाचं काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत होती. चांदणी चौकातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी फुटणार असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर खरंच वाहतुकीत काही फरक जाणवेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :