पंढरपुरात बाप्पांना घरी नेण्यासाठी 11 रिक्षाचालकांची मोफत सेवा
बाप्पाला घरी नेताना अडचण येऊ नये, बाप्पाचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून पंढरपुरात 11 रिक्षाचालकांनी भाविकांना मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
पंढरपूर : गणेशोत्सवाचा राज्यभर उत्साह पाहायला मिळत आहे. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. बाप्पाला घरी नेताना अडचण येऊ नये, बाप्पाचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून पंढरपुरात 11 रिक्षाचालकांनी भाविकांना मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
आज सकाळपासूनच पंढरपूर शहरातील गणपती गल्लीमध्ये बाप्पांना घरी नेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे विष्णू शेटे यांनी 11 मित्रांसह बाप्पाला घरी नेण्यासाठी आलेल्या भाविकांना मोफत रिक्षा सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांनी त्यांच्या रिक्षांवर मोफत सेवेचे फलक लावून शहर व उपनगरातील नागरिकांना बाप्पासह घरपोच सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
आज दिवसभर हे सर्वजण ही सेवा पुरवणार आहेत. गरज पडल्यास आणखी रिक्षा उपलब्ध करून देण्याची तयारी या तरुणांनी केली आहे. सणावाराला अडवून भाडे वसूल करणारे रिक्षाचालकांची प्रतिमा विष्णू शेटे आणि त्यांच्या तरुण मित्रांनी पुसण्याचे काम केलं असून नागरिकांकडून त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
संबधित बातम्या