बेकायदा गर्भपात प्रकरणी माजी आमदाराच्या डॉक्टर पुत्राला अटक
बेकायदा गर्भपात प्रकरणी डॉ. श्रीकांत मर्दा यांच्यावर पोलिसांनी एमटीपी अॅक्ट 1971 अंतर्गत कारवाई केली आहे. डॉ. श्रीकांत हे माजी आमदार दिवंगत किसनलाल मर्दा यांचे पुत्र आहेत.
पंढरपूर : मंगळवेढ्याचे माजी आमदार दिवंगत किसनलाल मर्डा यांच्या डॉक्टर मुलाला बेकायदा गर्भपात प्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. कुंभार गल्ली परिसरातील मर्दा नर्सिंग होम आणि एक्स-रे क्लिनिक येथे बेकायदेशीर गर्भपात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी 67 वर्षीय डॉ. श्रीकांत किसनलाल मर्दा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. श्रीकांत मर्दा यांनी 11 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान तीन महिलांकडून बेकायदेशीरित्या गर्भपात करण्याच्या उद्देशाने मोठी रक्कम स्वीकारली होती. खोटे रिपोर्ट्स तयार करुन महिलांच्या गर्भातील तीन ते साडेतीन महिने वयाच्या लहान मुलींना डॉ. मर्दा यांनी आजारी दाखवलं. त्यानंतर त्यांचा गर्भपात घडवून आणला. पैसे उकळण्याचा उद्देशाने हा सगळा प्रकार घडवू आणला गेला आहे.
डॉ. श्रीकांत मर्दा यांच्याविरोधात पोलिसांनी एमटीपी अॅक्ट 1971 मधील तरतुदींचे उल्लंघन करुन बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच इंजेक्शनच्या रिकाम्या अॅम्पुल्स पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने एका पत्र्याच्या डब्यात जाळून टाकल्या प्रकरणीही गुन्हा दाखल केला आहे. यामागे मोठं रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय असून याप्रकरणी मंगळवेढा पोलीस अधिक तपास करत आहेत.