Sanjay Raut : भाजपमध्ये सगळेच जवळचे; ते आमच्यासाठी गुळाचं पोतं : संजय राऊत
आमच्यासाठी भाजपमध्ये गुळाचं पोतंच आहे. सगळं गोडच आहे आमचं. भाजपमध्ये सगळेच जवळचे असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.
Sanjay Raut : विरोधक हे आमचे व्यक्तिगत शत्रू नाहीत. वैचारीक शत्रू असतील. त्यांच्याशी आम्ही त्या पद्धतीनं लढू, सुडाचं किंवा बदल्याच्या भावनेनं लढण्याचा प्रश्न येत नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. भाजपमध्ये तुमच्यासाठी कोणी साखरेची गाठ आहे का? असा राऊत यांना प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, आमच्यासाठी भाजपमध्ये गुळाचं पोतंच आहे. सगळे गोडच आहे आमचं. भाजपमध्ये सगळेच जवळचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाह, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांची यावेळी संजय राऊत यांनी नावे घेतली. दरम्यान, मी जर बोललो नाही तर अनेक विरोधकांची राजकीय दुकानं बंद होतील असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, भांडण हे विचारांचे असायला हवे. व्यक्तिगत शत्रूत्वाने जर तुम्ही भांडणं करायला लागला तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का बसेल. अगदी यशवंतराव चव्हाण ते बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांपर्यंत कधीही सुडाचे राजकारण केल्याचे आठवत नाही. आमच्यावर ते संस्कार असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. राज ठाकरे आज अयोध्येला जाण्याची घोषणा करु शकतात, यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलं की, राम सर्वांचा आहे. जायला हवे. बाळासाहेबांच्या पावलावर प्रत्येकाने पाऊल ठेवलं पाहिजे. बाळासाहेब देशाचे आहेत. प्रत्येक समाजाचे आहेत. हिंदूचे आहेत, मराठी माणसाचे आहेत. प्रत्यकाने त्यांच अनुकरण केले पाहिजे असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
राज्य निर्बंधमुक्त, राज्य सरकारची जनतेला भेट
आजपासून राज्य निर्बंधमुक्त केले आहे. ही राज्य सरकारने राज्याच्या 12 कोटी जनतेला गुढीपाडव्याची दिलेली भेट आहे. आजपासून जनता ही पूर्णपणे निर्बंधमुक्त झाली आहे. आता जनता मोकळेपणाने श्वास घेऊ शकेल. सगळे व्यवहार हे आनंदाने करु शकेल. मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही भेट असल्याचे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रावरती शिवसेनेची गुढी सदैव फडकत आहे, फडकत राहिल. महाराष्ट्राच्या बाहेरही गुढी फडकवण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. गुढी हा पवित्र, संस्कार, संस्कृती, धर्म यासंदर्भातील विषय आहे. त्यामुळं गुढी कोणाची पाडायची नसते, त्यांच्यापेक्षा आपली गुढी कशी उंच होईल हे पाहायचे असते असेही राऊत म्हणाले. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, त्याच्यामध्ये हिंदुत्वही आले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र धर्म वाढवायचाय हे ध्येय असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. विरोधक हे आमचे शत्रू नाहीत. वैचारीक विरोध असेल, त्यांच्याशी त्या पद्धतीने लढू असे राऊत म्हणाले.