वर्दीवर हल्ला! वाहतुकीवरून झालेल्या वादात सेवानिवृत्त महिला पोलीस निरीक्षकाने घेतला महिला पोलीस उपनिरीक्षकाचा चावा
राज्यातील पोलीस सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पोलिसाच्या डोक्यावर तलवारीने वार केल्याची घटना ताजी असताना पंढरपुरात निवृत महिला अधिकाऱ्यानं महिला फौजदाराचा चावा घेतल्याची घटना घडली आहे.
पंढरपूर : कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावणारे राज्यातील पोलीस सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केली. तर अंबरनाथमध्ये टोळक्याने एका पोलिसाच्या डोक्यावर तलवारीने वार केल्याची घटना ताजी असताना पंढरपुरात निवृत महिला अधिकाऱ्यानं महिला फौजदाराचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वर्दीवर हात उचलणाऱ्याचं काय करायचं हा प्रश्न विचारला जात आहे.
पंढरपूर पोलीस उपविभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी वाहतुकीचे नियमन करणाऱ्या महिला पोलिसांशी एका सेवानिवृत्त महिला पोलीस निरीक्षकाने हुज्जत घालण्यास सुरुवात केली . यावेळी तिने वरिष्ठांना बोलावून घेतल्यावर त्यांच्याशीही हुज्जत घालणाऱ्या या निवृत्त महिला अधिकाऱ्यास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी शहर पोलीस ठाण्यात नेण्याचे आदेश दिले. यावेळी या महिला अधिकाऱ्याने आपली कार रस्त्यात आडवी लावून रास्ता बंद केल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले येथे तिने असाच उद्दामपणा सुरु ठेवत चौकशी करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा चावा घेतला .
पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगली अद्दल घडवायचा इशारा दिला आहे. पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या या महिला अधिकाऱ्याच्या उद्दाम वर्तनानंतर पोलिसात सरकारी कामात अडथळा, कोरोना नियमांचे उल्लंघन आणि भादविक 353, 332, 324, 341, 323, 506, 268, 269, 34 प्रमाणे पोलिस कॉन्सटेबल कविता चोपडे यांनी तक्रार दिली असून यातील निवृत्त महिला अधिकारी व तिच्या मुलावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा लोकांवर जरब बसली पाहिजे : संजय राऊत
"पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचंच आहे. कर्तव्याचं पालन करणाऱ्या हवालदारावर हात टाकणारे हे लोक कोण आहेत आहेत? यांच्यात हिंमत कुठून येते? यात सरकार कोणाचं आहे हा प्रश्न नाही. मुंबई पोलीसच नाही तर देशातल्या कोणत्याही पोलिसांवर हात टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. या महिलेने केलेला गुन्हा किती अक्षम्य आहे हे पोलिसांनी आणि न्यायालयाने दाखवण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना माफिया म्हणणं, त्यांच्यावर घाणेरडे आरोप करणं, मुंबई पोलिसांचं मानसिक खच्चीकरण करण्याची जी मोहीम राबवली होती, त्यातून अशा लोकांना बळ मिळतं. पोलीस राजकारणासाठी नाहीत. पोलीस असुरक्षित नाही. असे माथेफिरु सगळीकडे असतात. हे माथेफिरुपणाचं लक्षण आहे. कायदा, पोलीस आमचं काय बिघडवणार आहेत, अशा यांची मानसिकता आहे. पोलिसांनी त्यांचं बिघडवून दाखवावं. पोलिसांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, अशी जरब बसली पाहिजे," अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या :