जालना : भारतात ओमायक्रॉनच्या (OMICRON ) रूग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही ओमाक्रॉनचे 54 रूग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून (Health Department ) खबरदारी घेण्यात येत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. "कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल. मात्र याबाबत घाबरून जाण्यासारखा विषय नाही. यात हॉस्पिटलाईज होण्याचे प्रमाण कमी असून येणाऱ्या नाताळ आणि नववर्षात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
"राज्यात 1 कोटी 26 लाख लोक लसीकरनापासून वंचित आहेत. परंतु, सध्या रोज साडेसहा लाख लोकांचे लसीकरण होत असून या गतीने लसीकरण झाल्यास 20 दिवसात लसीकरण पूर्ण होऊ शकेल, अशी माहितीही टोपे यांनी दिली आहे. लस न घेतलेल्या लोकांची गाव निहाय यादी करून प्रत्येक व्यक्तीला मॅसेज पाठवण्यात येणार आहे. सध्या आरोग्य विभागाचे जास्तीत-जास्त लसीकरणावर लक्ष असल्याचे असल्याचे मंत्री टोपे यावेळी म्हणाले.
कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली नाही
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची आकडेवारी महाराष्ट्र सरकारने लपवली असे आरोप केले जात होते. परंतु, आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. "कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवलेली नाही. अनेकवेळा डिस्चार्ज झाल्यानंतर वेगळ्या कारणाने मृत्यू झाल्यामुळे त्याची नोंद कोरोना मृत्यू मध्ये होत नाही. स्वॅब न घेता केवळ सिटी स्कॅन रिपोर्टवरून पॉझिटिव्ह ठरवलेल्या रुग्णांची संख्या पोर्टलवर अपलोड झालेले नाही. त्यामुळे आकडेवारी मध्ये फरक दिसस असेल" असे टोपे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या