India Omicron cases : जगभरासह भारतात दररोज ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 161 वर पोहचली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली आहे. अशातच केंद्र सरकारने स्थापन केलेल्या INSACOG ( Indian SARS-CoV-2 Genomics Consortium - भारतीय सार्स सीओवी-2 जिनोमिकी समिती ) समितीने सोमवारी महत्वाची माहिती दिली आहे. ओमायक्रॉन भारतासाठी धोकादायक असल्याचे अद्याप कोणतेही पुरावे नाहीत, असे INSACOG सोमवारच्या बुलेटीनमध्ये सांगितले आहे.
भारतातील संसर्ग आणि प्रतिकारशक्तीवर मात करण्याची क्षमता अथवा गंभीर आजार निर्माण करण्याबाबात ओमायक्रॉनबाबत अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असे INSACOG सांगितलेय. जीनोमिकच्या विविधतेवर काम करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने INSACOG याची स्थापना केली आहे. देशभरातील कोरोना जीनोमवर ही संघटना काम करते. भारतासह जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाच्या संख्या (Omicron Variant Cases) दररोज वाढत आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 161 (Omicron Cases Total India) पर्यंत पोहचली आहे. राजधानी दिल्लीमध्ये आतापर्यंत 32 तर महाराष्ट्रातील रुग्णाच्या संख्या 50 च्या पुढे गेली आहे. जगभरातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
INSACOG ने सोमवारच्या बुलेटिनमध्ये म्हटले की, 'भविष्यात भारतामध्ये संक्रमण दर, प्रतिकारशक्तीवर मात करण्याची क्षमता अथवा गंभीर आजार उत्पन्न करण्याची क्षमता ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये असल्याचे कोणतेही पुरावे स्पष्टपणे अद्याप मिळालेले नाहीत.' कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन धोकादायक आणि चिंताजनक आहे. जगभरात विविध देशात वेगानं पसरत आहे, असं याधीच्या बुलेटीनमध्ये म्हटले होतं.
भारतामधील परिस्थिती काय? (India Omicron cases)
भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 161 (Omicron Cases Total India) पर्यंत पोहचली आहे. यामधील एका रुग्णाची स्थिती गंभीर आहे तर 42 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. 12 राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्ली 32, तेलंगणा- 20, राजस्थान-17, गुजरात- 13, केरळ-11, कर्नाटक-8, उत्तर प्रदेश 2 आणि तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंडीगढमध्ये प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळले आहेत.
पुढील महिना सर्वाधिक धोकादायक, ओमायक्रॉन व्हेरियंटवर वैज्ञानिकांचा इशारा -
वॉशिंगटन पोस्टच्या वृत्तानुसार, डेनमार्कमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्ण झपाट्याने वाढत आहे. रुग्णाची संख्या दुपटीने वाढली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून डेनमार्कमधील सीरम इन्स्टिट्यूटने इशारा दिला आहे. ही फक्त सुरुवात आहे, यापुढे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा डेनमार्कमधील सीरम इन्स्टिट्यूटने दिला आहे. येथील वैज्ञानिक टायरा ग्रोव कूस म्हणाले की,' आगामी महिना सर्वात धोकादायक असेल. ओमायक्रॉन व्हेरियंटबाबात अद्याप संपूर्ण माहिती मिळाली नाही.' डेनमार्कमधील रुग्णालयात ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत वाढ होईल, असा अंदाजही वर्तवला जातोय. टायरा ग्रोव कूस यांनी सांगितलं की, डेनमार्कमधील समोर आलेल्या आकडेवारीनुसार लसीचे दोन डोस घेतले असले तरीही तितकाच धोका असेल. पण ज्यांनी लसीचा बूस्टर डोस घेतलाय, त्यांना कोरोना होण्याचा धोका कमी आहे. 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकामधील गोटेंग प्रोव्हिंस येथे ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. 26 नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO ) या विषाणूला धोकादायक म्हणून घोषीत केलं होतं.