शिवसैनिक म्हणून आले आणि शिवसैनिक म्हणून काम करणार : उर्मिला मातोंडकर
काँग्रेसमध्ये होते तेव्हा देखील मी पदाची अपेक्षा केली नव्हती, आज शिवसेनेत आले तरीही पदाची अपेक्षा नाही.मला लोकांसाठी काम करायचे म्हणून शिवसेनेत आल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केले.
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं. मी शिवसैनिक म्हणून आली आहे आणि शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. काम करण्याची इच्छा असल्याने कोणत्याही अपेक्षाविना शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
कॉंग्रेस सोडताना मी राजकारण कधी सोडलं नाही. लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. लोकांनी बनवलेली लीडर होणं पसंत करेन. शिवसेनेची महिला आघाडी भक्कम आहे, मला आनंद आहे की मी त्याचा भाग आहे. मुंबईत महिला सुरक्षित असून आणि त्यामुळे मुंबईचा मला अभिमान आहे.
टीकांचे स्वागत करते
उर्मिला मातोंडकर यांच्यावर होणाऱ्या टीकांवर विचारले असता त्या म्हणाल्या, भाजपच्या टीकांचे स्वागत करते, सगळे ट्रोल माझ्यासाठी पारितोषकाप्रमाणे आहे. मी मराठी आहे. ट्रोलमुळे मी पाऊल मागे घेणार नाही.
बॉलीवूड हे मुंबईच्या रक्ताशी जोडलेले
बॉलीवूडची काळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न मधल्या काळात झाला. बॉलीवूड हे काही 4-5 स्टारचे नाही, जे तुम्हाला आवडत नाहीत. बॉलीवूडमध्ये असंख्य लोक काम करतात. बॉलीवूड हे मुंबईच्या रक्ताशी जोडलेले असून बॉलीवूड व मुंबई हे वेगळे होणार नाही.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा वाढला पाहिजे त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे, असं शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोनवर सांगितल. कंगना रनौतविषयी बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, कंगनाला उत्तर नाही देणार. तेव्हाही टीका केली नव्हती, ओघात उत्तर दिले होते. योगी आदित्यनाथ यांचे मुंबईत स्वागत आहे. आपल्या अतिथींचे स्वागत करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असंही उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
पक्षप्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनताई ठाकरे यांच्या प्रतिमेला नमन केलं. "फार असं वाटतंय की असायला पाहिजे होते हे, एकच गोष्ट खरोखरच मिस करतेय," अशा भावना उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.