Today's Top News : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
National News : एबीपी माझाच्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत असतो.
मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची तुरुंगात सुटका होऊ शकते
अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. नवनीत राणा आणि रवी राणा यांना 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील खाजगी निवासस्थान 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या जाहीर घोषणेवरून झालेल्या वादानंतर अटक करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला. जामिनावर सुटल्यानंतर अर्जदाराने असा कोणताही गुन्हा करू नये आणि प्रकरणाशी संबंधित कोणत्याही विषयावर माध्यमांशी बोलू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, आज त्यांची तुरुंगात सुटका होऊ शकते.
जोपर्यंत मशिदीत लाऊडस्पीकर वाजत आहेत, तोपर्यंत हनुमान चालीसा मोठ्या आवाजात वाजतच राहणार : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सांगितले की, जोपर्यंत मशिदींवरील लाऊडस्पीकर बंद होत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवत राहतील. पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांची खिल्ली उडवली आणि सांगितले की, पोलिस त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत, परंतु जे कायदा पाळत नाहीत त्यांना सोडत आहेत. राज ठाकरे यांनी दावा केला की, जेव्हा त्यांनी मशिदीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले, तेव्हा 90 ते 92 टक्के मशिदींनी सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरला नाही. बुधवारपासून मशिदींवरील लाऊडस्पीकरविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. राज ठाकरे यांनी दावा केला की मुंबईत 1,104 मशिदी आहेत, त्यापैकी 135 मशिदींनी बुधवारी सकाळच्या प्रार्थनेदरम्यान लाऊडस्पीकरचा वापर केला. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या मशिदींवर काय कारवाई केली जात आहे, असा सवाल त्यांनी केला.
माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा मनसुखच्या हत्येचा मुख्य सूत्रधार : एनआयए
मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसुख हिरण हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा असल्याचं सांगण्यात येत आहे. एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरण यांची हत्या कर्णयातही एक मोठी रक्कम दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप शर्मा यांच्या जामिनाच्या सुनावणीवेळी एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यात असं सांगण्यात आलं आहे की, सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मांना 45 लाख रूपये दिले होते. यासोबतच मनसुख हिरण यांचा हत्येचा कात हा प्रदीप शर्मा यांनीच रचला होता, असं या प्रतिज्ञापत्रात एनआयएने म्हटलं आहे. हे प्रतिज्ञापत्र दाखल करत एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या जामिनाला विरोध केला आहे. याप्रकरणी आणखी काही नावे समोर येऊ शकतात. यातच हे 45 लाख रुपये नेमके दिले कोणी? सचिन वाझे यांनी दिले आहे, तर त्यांना हे पैसे दिले कोणी? याबाबत एनआयए तपास करत आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शरद पवारांना पाच आणि सहा मे रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे
भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील युद्ध स्मारकावर जानेवारी 2018 मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाच आणि सहा मे रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने यापूर्वी 2020 मध्ये पवारांना समन्स बजावले होते, परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे ते आयोगासमोर हजर राहू शकले नाहीत.
यवतमाळ- वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले
यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. महिला प्रतिष्ठान ट्रस्टमधील मनी लाँड्रिंग प्रकरण बरेच जुने आहे. याआधीही भावना यांना ईडीने समन्स बजावले होते, मात्र त्या अद्याप ईडीसमोर हजर झालेल्या नाही. ईडी गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ट्रस्टचे खाजगी कंपनीत फसवणूक करण्याच्या गुन्हेगारी कटाच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत आहे.
आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघात लढत
आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेत पाचव्या स्थानी असलेल्या हैदराबादला आजचा विजय पुढील फेरीत एन्ट्रीसाठी महत्त्वाचा आहे. तर दिल्लीही चार विजयासंह सातव्या स्थानी असल्याने त्यांनाही स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज विजय मिळवणं महत्त्वाचं आहे.