मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ; गृह खात्याचे आदेश
Jitendra Awad : औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर भाष्य करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं.
मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad ) यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचे गृह खात्याने (Home Ministry) आदेश दिले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांच्या जीवाला मोठा धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे गृह खात्याने आदेश दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांना सध्या वाय प्लस सुरक्षा आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांची सुरक्षा वाढवण्याचे गृह खात्याने पोलिस दलाला आदेश दिले आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळी जास्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी गृहखात्याने परिपत्रक काढलं आहे.
औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर भाष्य करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय. भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आव्हाड यांचा व्हिडीओ ट्विट करत औरंगजेबाच्या प्रेमाखात आणखी कोणत्या थराला जाणार आहात असा प्रश्न विचारला आहे. महाजन यांच्यासह राज्यभरातील अनेक नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केलीय. त्यातच आता त्यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश गृहखात्याने दिले आहेत.
येथून सुरू झाला वाद
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर ही पदवी देऊ नका ते धर्मवीर नव्हते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य रयतेसाठी निर्माण केलं त्याचं रक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्यावर भाजपाकडून आणि शिंदे गटाकडून सातत्याने टीका होते आहे. शिवाय भाजपकडून त्यांच्या विरोधात आंदोलने देखील केली जात आहेत. याच वादावर बोलताना औरंगजेब हा क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
"छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या
Jitendra Awhad : 'औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं', जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य