एक्स्प्लोर
चंद्रभान सानपला फाशीच, उच्च न्यायालयाकडून शिक्षा कायम
सानपला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. तो यापुढे सुधारण्याची शक्यताही नाही. अशा व्यक्तीचं समाजात राहणं हे धोकादायकच आहे. त्यामुळे ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे,' असे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं आपल्या अंतिम निकालात सांगितलं आहे.

मुंबई : इस्थर अन्हुया अत्याचार आणि खून प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं चंद्रभान सानपला दिलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. चंद्रभान सानपनं या शिक्षेविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केलेली अपीलही फेटाळून लावण्यात आली आहे. 'सानपला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. तो यापुढे सुधारण्याची शक्यताही नाही. अशा व्यक्तीचं समाजात राहणं हे धोकादायकच आहे. त्यामुळे ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे,' असे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं आपल्या अंतिम निकालात सांगितलं आहे. इस्थर अन्हुया आंध्र प्रदेशातील आपल्या मूळ गावाहून पाच जानेवारी 2014 रोजी मुंबईत परतली होती. रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनसला ती पहाटेच्या सुमारास पोहोचली. आपण टॅक्सी चालक असल्याचं भासवून तुला तुझ्या घरी सोडतो, असं चंद्रभाननं इस्थरला सांगून तिला आपल्या दुचाकीवरुन अंधेरीऐवजी वेगळ्याच ठिकाणी नेलं. ही बाब लक्षात येताच त्याला इस्थरनं विरोध केला. त्यानंतर सानपनं तिला ईस्टर्न एक्स्प्रेसवर भांडुप येथील झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा खून करुन तिथेच तिचा मृतदेह जाळून टाकला. पोलिसांना तिचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला होता. विशेष महिला कोर्टाने हा प्रकार क्रूर तसंच अमानवी असल्याचं म्हणत सानपला फाशीची शिक्षा सुनावली आहे. इस्थरवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला होता. मे महिन्यात क्राईम ब्रँचने या प्रकरणी किल्ला कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं. आरोपी चंद्रभान सानप या प्रकरणात दोषी असून त्याच्यावर अत्याचार करणे, दरोडा, पुरावा नष्ट करणे, गंभीर दुखापत करणे असे गुन्हे लावण्य़ात आले होते. एकूण 542 पानांचं आरोपपत्र असून यात 42 साक्षीदार तपासले गेले होते.
आणखी वाचा























