Maharashtra Rain : पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यात पुढील 24 तासात याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्प पूर्व भागात खेचले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे. कोकणाच्या किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किमी प्रती तास राहण्याची शक्यता आहे. अशातच, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. सोबतच 30 जुलै आणि 31 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातल्या घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 जुलै आणि 31 जुलै रोजी ह्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात 70-200 मिमीपर्यंतचा पाऊस अपेक्षित असेल. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 आणि 31 जुलै रोजी घाट माथ्यांकरीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिथे 70 ते 200 मिमीपर्यंतच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
मुंबई आणि उपनगरात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात 15-64 मिमीपर्यंत मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस होऊ शकतो. तर 30 आणि 31 जुलै रोजी मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता. पुढील पाचही दिवस विदर्भात पाऊस बघायला मिळेल. मात्र, 30 आणि 31 जुलै रोजी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सर्वत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.