तळकोकणात मुसळधार पावसामुळे पियाळी व गडनदीला पूर; मसुरे, बांदिवडे गावचा संपर्क तुटला
पियाळी नदीकाठच्या देवगड तालुक्यातील गडिताम्हाणे, रहाटेशवर, बागतळवडे, तळवडे, पावणाई, वानिवडे तर कणकवली तालुक्यातील नांदगाव, तरेळे, खारेपाटण या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. गडनदीला पूर आल्याने गडनदी पात्रातील मालवण तालुक्यातील खोत जुवा व मसुरकर जुवा या बेटावरील ग्रामस्थांच्या घरासभोवताली पुराच्या पाण्याने वेढले. गडनदी पात्राबाहेर वाहत असल्याने मसुरे कावावाडी, टोकळवाडी, उसलाटवाडी यासह बांदिवडे, सय्यदजुवा, भगवंतगड या भागातील संपर्क तुटला. बांदिवडे मळावाडी भागातील ग्रामस्थांनी आपली गुरे तसेच वाहने बांदिवडे पुलाच्या जोड रस्त्यावर आणून लावली आहेत. तर पियाळी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांत पूरस्थिती निर्माण होऊन गेल्या दोन दिवसांपासून भातशेती पाण्याखाली गेल्याने कुजण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
पियाळी नदीकाठच्या देवगड तालुक्यातील गडिताम्हाणे, रहाटेशवर, बागतळवडे, तळवडे, पावणाई, वानिवडे तर कणकवली तालुक्यातील नांदगाव, तरेळे, खारेपाटण या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. कणकवलीतील बिडवाडी-सांडवे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प तर बिडवाडी गावातील पाच वाड्यांचा संपर्क तुटला. कणकवली अतिवृष्टीतमुळे वागदे-कसवण-आंब्रड जाणारा रस्ता खचला आहे. रस्त्याचा काही भाग जवळपास एक ते दीड फूट खचल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वागदे मांगरवाडी येथे हा रस्ता खचल्याने मोटरसायकल वगळता, या मार्गावरील अन्य वाहतूक ठप्प आहे. दोन वर्षापूर्वी येथील रस्त्याचा काही भाग खचला होता.
मालवण तालुक्यातील आचरा गावात पारवाडीमध्ये कालावल खाडींना पूर आल्याने खाडीकिना-या लगतच्या भागात पुरस्थीती निर्माण झाली आहे. भातशेती पाण्याखाली गेली तर किनाऱ्यालगत भागातील ग्रामस्थांच्या घरालगत पाणी आले आहे. सावंतवाडीतील मळगाव-रेल्वेस्टेशन रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले. दरम्यान घटनास्थळी झाड बाजूला करून रस्ता सुरळीत करण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे कामानिमित्त सावंतवाडी तसेच अन्य ठिकाणी जाणार्यांचा खोळंबा झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासातकणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 2260मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी दोडामार्ग - 119(2145), सावंतवाडी - 130(2380.10), वेंगुर्ला - 145(1956), कुडाळ - 144(2159), मालवण - 190(2708), कणकवली - 240(2374), देवगड - 200(2084), वैभववाडी - 170(2281), असा पाऊस झाला आहे.
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 31 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 368.1440 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.29 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 106.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.